पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उमटला. पुढे १९३२ मध्ये त्यानी श्रीनारायणराव केडगावकर याजकडून नाममंत्र घेतला. १९३३ साली परमसंत श्रीसद्गुरू बाबा सावनसिंगजी महाराज, बियास यांचा गुरूपदेश त्याना मिळाला. पुढे गुरूदेव रानडे यांचा अनेक वर्षे सहवास त्याना मिळाला. त्यामुळे "सुखदुःखे समेकृत्वा, लाभालाभौ जयाजयौ " अशाप्रकारची स्थितप्रज्ञ वृत्ती त्यांच्या अंगी स्वाभाविकपणे बाणली होती. ३६ वर्षे सांगली संस्थानचे राजपद भोगूनहि त्यांची वृत्ती विश्वस्ताची होती, म्हणूनच राजसंन्यास घेताना त्यांच्या मनाला कणभराचेही क्लेश झाले नाहीत.

 त्याना राजपद मिळणे हा एक योगायोगाचा आणि पूर्वजांच्या पुण्याईचा भाग होता. त्यांचे आजोबा सांगली संस्थानच्या पहिल्या अधिपतीना, श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब याना दत्तक गेले होते, पण दत्तक घेतल्या घेतल्या राजेसाहेबाना औरस संततीचा लाभ झाला! मग रद्दबातल झालेल्या दत्तकपुत्राला एकप्रकारची भरपायी म्हणून रु. २५०००/- ची जहागीर देण्यात आली आणि अशी नोंद करण्यात आली की भविष्यकाळात कधी 'गरज' पडली तर या रद्दबातल झालेल्या पटवर्धन घरातील सर्वात मोठ्या मुलाला दत्तक घ्यायचे. गमतीची गोष्ट म्हणजे पुढे खरोखरच अशी वेळ आली! सांगलीचे नंतरचे अधिपती श्रीमंत धुंडीराजसाहेब ऊर्फ तात्यासाहेब निपुत्रिक म्हणून १९०१ मध्ये निधन पावले. तेव्हा वर उल्लेखलेले विनायकराव म्हणजेच प्रस्तुत लेखविषय असलेले चिंतामणराव पटवर्धन दत्तक घेतले गेले. पूर्वीच्या करारानुसार. एकूण काय, तर आजोबांचा हुकलेला राजयोग नातवाच्या नशीबी होता ! १५ जून १९०३ रोजी ब्रिटीश राज्यकर्त्यांकडून सांगलीचे तृतीय अधिपती म्हणून या श्रीमंत राजेसाहेबांची अधिकृत नियुक्ती झाली, अर्थात ब्रिटीशांच्या शिरस्त्याप्रमाणे, कॅ. बर्क या सांगली संस्थानात असलेल्या अॅडमिनिस्ट्रेटरकडून प्रश्नोत्तररूपी कठोर चाचपणी झाल्यानंतरच ! दिवंगत राजेसाहेब कै. तात्यासाहेब पटवर्धन यांच्या पत्नीच्या, श्रीमंत बुध्दीमतीबाईसाहेब पटवर्धन यांच्या मांडीवर, राजेसाहेबाना समारंभपूर्वक दत्तक देण्यात आले. त्यावेळी चिंतामणराव पटवर्धन तथा आप्पासाहेबांचे वय अवघे तेरा वर्षाचे होते.

 तत्कालीन पध्दतीप्रमाणे राजेसाहेबाना राज्यकारभाराच्या दृष्टीने सुयोग्य शिक्षण मिळावे म्हणून जून १९०३ पासून ते एप्रिल १९०९ पर्यंत राजकुमार कॉलेज, राजकोट येथे ठेवण्यात आले. राजेसाहेबांच्या सुदैवाने तेथे त्याना नानासाहेब परांजपे हे ट्यूटर म्हणून लाभले. तरूण राजपुत्रांना त्यांच्या कलाने घेऊन चांगल्या सवयी कशा लावाव्यात याची त्याना चांगली जाण होती. नेमलेला अभ्यासक्रम पूर्ण करतानाच त्यानी राजेसाहेबांकडून जेम्स अॅलन या इंग्रज ग्रंथकाराची काही चांगली पुस्तके


सांगली आणि सांगलीकर..............................................................१२