पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भालचंद्र म्हैसकरांसारख्या सांगलीकराने विश्वपटलावर नेऊन ठेवले आहे. बाबासाहेब बोडस, मोरभट मेहेंदळे, विनायकराव खाडिलकर, गोपाळराव मुजुमदार, तमण्णा पडसलगीकर या 'कालच्या' बुद्धीबळपटूंपासून तो आजच्या भाऊराव पडसलगीकर, भाग्यश्री साठे (ठिपसे), स्वाती घाटे, या सर्वानी बुद्धीबळाच्या खेळात सांगलीचे नाव दुमदुमत ठेवलं आहे.

 शैक्षणिक क्षेत्रात सांगलीचा दबदबा तर पहिल्यापासूनच होता. याचं बरंचसं श्रेय पटवर्धन संस्थानिकांकडे जाते. १८६१ मध्ये सांगलीत सार्वजनिक शिक्षणाला सुरुवात झाली. लागलीच दोन वर्षांनी मराठी शाळा निघाली. १८६५ मध्ये शास्त्रशुद्ध वेदशास्त्र शिकवले जावे म्हणून वेदशास्त्र शाळेची स्थापना झाली. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, न्याय, व्याकरण, ज्योतिष अशी शास्त्रे शिकवणाऱ्या पाच वेदशाळा काढण्यात आल्या. १९१० मध्ये प्राथमिक शिक्षण सांगलीत आणि संपूर्ण सांगली संस्थानात मोफत तर झालेच पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे सांगली हे सुशिक्षिताचं गांव म्हणून पुण्याखालोखाल ओळखले जाऊ लागले. या वेदशास्त्राच्या प्रभावामुळे संस्कृत विद्येचा प्रसार सांगलीत मोठ्या प्रमाणावर झाला. देवधरशास्त्री, पाटीलशास्त्री, के. जि. दीक्षित अशा नामवंत संस्कृत - तज्ञांनी तत्कालीन मुंबई विश्वविद्यालयाच्या परीक्षांमध्ये, जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती विजेत्यांची गौरवशाली परंपराच सांगलीत निर्माण केली. धारवाड ते पुणे अशा विस्तृत पट्टयात कॉलेज शिक्षणाची सोय नव्हती, तेव्हा स्वतः पुढाकार घेऊन श्रीमंत राजेसाहेबानी सांगलीत १९१९ मध्ये विलिंग्डन कॉलेजची स्थापना करवली. १९३३ मध्ये निव्वळ मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा या हायस्कूलची स्थापना झाली. १९४७ मध्ये वालचंद इंजिनिअरींग कॉलेजची स्थापना झाली. १९६१ साली या भागातील (कोल्हापूर, बेळगांव वगळता) पहिले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सांगली शिक्षण संस्थेने सुरु केले. तसेच १९९८ मध्ये याच संस्थेने सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी पहिलीच “सैनिक शाळा" सुरु केली. आज तासगांव या पहिले परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या ऐतिहासिक नगरीत दत्तमाळावर सर्वसोयीनी सुसज्ज अशी ही सैनिकशाळा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

 स्वातंत्र्यपूर्व काळात अशा शैक्षणिक घडामोडींचे अप्रूप होतं. स्वातंत्र्योत्तर काळात तर शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी संपूर्ण जिल्ह्यात फक्त ३ महाविद्यालये होती, ती आता पन्नासच्या वर गेली आहेत. “अुदंड झाले शिक्षण" अशी सध्याची अवस्था आहे.

 स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व क्षेत्रात, विशेषतः शेती, अद्योग, व्यापार आदी


सांगली आणि सांगलीकर..............................................................९