पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चित्तरंजन कोल्हटकर, मामा भट, मामा पेंडसे, गणपतराव मोहिते ( अविनाश ) याजपासून तो अलीकडच्या यशवंत केळकर, गिरीश ओक यांजपर्यत अनेक नाट्यकलाकारांचा सांगलीशी घनिष्ट संबंध आला. दीनानाथ मंगेशकर, विश्राम बेडेकर यासारख्या दिग्गजांचे सांगलीत वास्तव्य होते. लता, आशा, हृदयनाथ या मंगेशकर भावंडाचं बालपण सांगलीतच गेलं. या सर्व बाबींमुळे सांगलीला "नाट्यपंढरी” म्हणून कौतुकाने गौरवले जाते. अनेक नाट्यव्यवसायी, वारकऱ्याच्या श्रद्धेने सांगलीत येऊन आपली नाट्यसेवा या 'पंढरी'त सादर करतात.

 सांगलीला ‘नाट्यपंढरी' म्हणून गौरवले जाते तसेच अनेक भाविक भक्तांना सांगली ही "कीर्तनपंढरी” वाटते. खुद्द सांगलीकर पटवर्धन मंडळी गजानन भक्त, कीर्तन-प्रवचनाला मुक्तपणे प्रोत्साहन देणारी. आजुबाजूच्या परिसरात नरसोबावाडी, औदुंबर, ब्रम्हनाळ यासारखी तीर्थक्षेत्रे. ह्या साऱ्या अनुकूल गोष्टी असल्या तरी सांगली आणि कीर्तन हा 'द्वंद्वसमास' रुढ झाला तो संतश्रेष्ठ तात्यासाहेब कोटणीस महाराजांच्या ३८ वर्षांच्या अखंड कीर्तनाने. कोणतीही बिदागी न घेता कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम त्यानी केले. मामामहाराज केळकर आणि दासराममहाराज केळकर यानी हा वारसा अखंडपणे जपला. रामानंदमहाराज खटावकर, त्यांचे परात्पर गुरु श्री सदाशिवमहाराज, बाबासाहेब मुजुमदार, सत्यव्रततीर्थ, मौनीबाबा, श्रीआनंदमूर्ती, कृष्णा परीट, अप्पाराव पोवार, अण्णाबुवा, धोडींराममहाराज, श्री नारायणमहाराज मळणगावकर, बुधगांवचे गुंडुबुवा, म्हादबा महाराज पाटील अशा अनेक थोर मंडळींनी सांगलीत कीर्तन जागवले. त्यामुळे भाविक मंडळी “सांगली भूमी कीर्तनाची । मस्तके लवती साऱ्यांची” असे श्रद्धेने म्हणतात.

 कोल्हापूरअितकी नसली तरी सांगलीचीसुद्धा खास अशी कुस्तीपरंपरा आहे. व्यंकप्पा बुरुड आणि हरीनाना पवार यानी या कुस्ती क्षेत्रात सांगलीला नाव मिळवून दिले. हरीनानांनी तर मल्लोपासनेचे विद्यापीठच अघडले. बलोपासनेइतकेच सद्वर्तणुक आणि सच्चारित्र्य याना ते महत्त्व देत; आणि त्यादृष्टीने कुस्तीगीर तयार करीत. हिंदकेसरी मारुती माने, ज्योतिराम दादा सावर्डे, विष्णु सावर्डे यांनी कुस्तीपरंपरेचे जतन केले. आजहि सांगलीत कुस्त्यांचा फड अभा राहिला की एकेक लाख लोक गर्दी करतात. बदलत्या काळानुसार मॅटवरच्या कुस्तीला महत्त्व आले असले तरी !

 खेळांच्या परंपरांचा विषय निघाला की आजच्या क्रिकेट या जबरदस्त लोकप्रिय खेळाची आठवण होते. सांगलीने या खेळाला एक विश्वमान्य असा खेळाडू दिला. त्याचे नाव विजय हजारे. नामांकित बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर आणि विजय हजारे या दोघांच्याहि खेळाची जडणघडण सांगलीतच झाली. या मैदानी खेळांबरोबरच बुद्धीबळासारख्या बैठ्या पण विलक्षण कौशल्याच्या खेळामध्येसुद्धा सांगलीचे नाव


सांगली आणि सांगलीकर..............................................................८