पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तामीळनाडू भागातूनसुद्धा सांगलीत हळदीची आवक होते.

 सांगलीच्या या हळद वायदे बाजाराला १९०५ पासूनचा दीर्घ इतिहास आहे. १९४० पर्यंत हा वायदेबाजार, चेंबर ऑफ कॉमर्स, सांगलीतर्फे चालवला जात असे. त्यानंतर तो दि स्पायसेस अॅण्ड ऑईलसीडस् एक्श्चेंज लि. सांगली या वायदे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संस्थेमार्फत चालवला जातो. रोज लाखो रुपयांचा व्यवहार करणारा हा वायदेबाजार शेअर बाजाराच्या धर्तीवर चालतो. सामान्य लोकाना तो एक प्रकारचा सट्टा वाटला तरी सरकारची मान्यता असलेला तो देशातील एकमेव मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित वायदेबाजार आहे.

 या हळदीनं, सांगलीचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलंय.

X-X-X

 व्यावहारिक जगतात सांगलीचं नाव अनेकविध अुद्योगांनी मोठं केलं असलं, तरी 'सांस्कृतिक सांगली' हा खरा सांगलीचा आत्मा आहे. महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक जगतात सांगलीच्या नावाला जी प्रतिष्ठा आहे, आदर आहे तो सांगलीच्या सांस्कृतिक समृध्दीमुळेच, हे निर्विवाद सत्य आहे.

 सांस्कृतिक दालनांपैकी सर्वप्रथम मनःपटलावर अुमटते ती सांगलीची नाट्यपरंपरा. सांगलीचे विष्णुदास भावे हे मराठी नाटकांचे आद्य जनक. १८४३ साली त्यानी 'सीतास्वयंवर' हे नाटक रंगभूमीवर आणलं. पुढील दीडशे वर्षात मराठी नाट्यसृष्टी चांगली फोफावली. म्हणून मराठी नाटकांची गंगोत्री असलेल्या सांगलीचं माहात्म्य आगळंच. या विष्णुदास भावे यानी ५२ नाटके मराठी रंगभूमीवर आणण्याचा पराक्रम केला. यापेक्षाहि मौजेची गोष्ट म्हणजे त्यानी १८५४ च्या सुमारास 'राजा गोपीचंद' या हिंदी नाटकाचा प्रथम प्रयोग रंगभूमीवर केला. त्यामुळे हिंदी रंगभूमीचे जनक म्हणूनहि त्यानी सांगलीचे नाव अखिल हिंदुस्थानात गाजवलं. त्यानंतर गोविंद बल्लाळ देवल या दुसऱ्या सांगलीपुत्राने 'शारदा', 'संशयकल्लोळ' सारख्या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवली. त्यावर कळस चढवला तो सांगलीच्याच आणखी एका सुपुत्राने. त्याचं नाव नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. प्रखर देशाभिमानी, ज्वलंत पत्रकार असलेल्या या लोकमान्य टिळकांच्या पट्टशिष्याने आपल्या संगीत आणि गद्य नाटकांनी मराठी नाट्यरसिकांना मंत्रमुग्ध करुन टाकले. म्हणून तर खाडिलकरांच्या कालखंडास मराठी रंगभूमीचे 'सुवर्णयुग' म्हणतात. यापाठोपाठ राम गणेश गडकरी यांचे शिष्य म्हणून गाजलेले न.ग. कमतनूकर हे पण सांगलीचेच नाटककार. केशवराव दाते यांच्या प्रेरणेने प्रतिवर्षी ५ नोव्हेंबर हा 'रंगभूमी दिन' सांगलीला थाटामाटात साजरा केला जातो. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर,


सांगली आणि सांगलीकर..............................................................७