पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आज जे सांगलीचं आधुनिक आणि प्रगत असं स्वरुप दिसत आहे त्याची अुभारणी निःसंशय स्वातंत्र्योत्तर काळात झाली. हे जितकं खरं, तितकंच, त्याची मुहूर्तमेढ संस्थानी काळात पटवर्धन राजकुटुंबाच्या दूरद्दष्टीने झाली हेहि खरं. १९०८ च्या सुमारास धनी वेलणकरांची 'श्री गजानन वीव्हिंग मिल' सुरु झाली. पाठोपाठ लड्डांची बालाजी मिल सुरु झाली. दांडेकर-भिडे मंडळींनी लोखंडी सामानाचे कारखाने सुरु केले. आरवाडे, अथणीकर मंडळीमुळे तेल गिरण्या अभ्या राहिल्या. सांगलीचे खऱ्या अर्थाने औद्योगीकरण सुरु करण्यात या मंडळींचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विधायक कार्यात स्वतःला झोकून दिलेल्या वसंतदादानी, औद्योगिक विकासाला जोराची चालना दिली. त्यानी पुढाकार घेऊन सांगली - माधवनगर रस्त्यावर औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. त्यात २५० च्यावर विविध अद्योगधंदे अुभे आहेत. पुढे शासनाने एम. आय. डी. सी. च्या माध्यमातून निव्वळ अुद्योगधंद्यासाठी ५०० प्लॉटस् राखून ठेवले. त्यापैकी दोनेकशे प्लॉटस्वर कारखाने कार्यरत झाले आहेत. फूड प्रॉडक्टस्, कन्फेक्शनरी, औषधे, टेक्स्टाईल्स्, स्टील कंटेनर्स, साबण, बॅटरी सेल्स, सर्जिकल बँडेज असे विविध प्रकारचे अुत्पादन तेथे सुरु आहे. या छोट्या अद्योगांशिवाय टाटा मेटल इंडस्ट्रीज, स्वीट कन्फेक्शनरी, अजय केमिकल्स, दारम फॉर्मास्युटिकल्स, तुंगा आर्मडाईज, नव महाराष्ट्र चाकण ऑईल मिल्स, जयराज टेक्स्टाईल अशा मोठ्या स्वरुपाचे अुद्योगधंदेहि आहेत. वसंतदादांसारख्या सहकार- महर्षीमुळे सांगली गाव आणि प्रामुख्याने सांगली जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळेच तयार झाले. त्यामुळे साखर कारखाने, सूतगिरण्या, तेलबिया गाळणाऱ्या गिरण्यांची रेलचेल झाली.

 पण सांगलीच्या अुद्योगांविषयी एकच एक वैशिष्ट्य सांगायची वेळ आली तर फक्त हळद-अुद्योगाविषयीच सांगायला लागेल. सांगलीचा हळद वायदे बाजार हा संपूर्ण देशात एकमेव आहे. या वायदेबाजारामुळे भारताच्या औद्योगिक नकाशावर सांगलीला एक अढळ स्थान प्राप्त झाले आहे. सांगलीच्या परिसरात पिकविली जाणारी 'राजापुरी' हळद ही एक अत्तम प्रकारची हळद आहे. हळदीची साठवण करण्याची अुत्तम सोय सांगली परिसरात असणे ही या वायदे बाजारामागची मुख्य जमेची बाब आहे. हळद पावसाच्या पूर्वी साठवावी लागते आणि कीड लागू नये म्हणून 'जमिनीखालीच ठेवावी लागते. सुदैवाने अशी अनुकूलता सांगली परिसरातील सांगलीवाडी व हरिपूर येथील नदीकाठच्या जमिनींमध्ये आहे. जमिनीखाली करण्यात आलेल्या साठ्याला 'पेव' म्हणतात. अशी नैसर्गिक पेवे हरिपूर व सांगलीवाडीच्या कृष्णाकाठांवर, दोन हजाराचे वर आहेत. एका पेवात अदमासे २०० पोती हळद साठवता येते. आंध्र प्रदेश, कर्नाटक,


सांगली आणि सांगलीकर.............................................................६