पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९२९ साली कृष्णा नदीवर आयर्विन ब्रिज बांधला गेला. त्यामुळे पुण्या- मुंबईच्या बाजूला थेट दळणवळण (मोटाररस्त्याने) चालू झाले. वारंवार येणाऱ्या कृष्णेच्या पुराने होणारे हाल या पुलामुळे तर वाचलेच; खेरीज व्यापार-अुद्योगाच्या वाढीसही ह्या पुलाची रचना अुपकारक झाली. १९३७ साली ज्युबिली इलेक्ट्रिक वर्क्सची स्थापना होऊन सांगलीत प्रथमच वीज खेळू लागली; पहिले वीज कनेक्शन अर्थातच श्रीगणपतीमंदिरास देण्यात आले.

 २४ जुलै १९४३ चा दिवस सांगलीच्या इतिहासातील एक गौरवास्पद दिवस. भूमिगत राहून ब्रिटीश सरकारविरुध्द सशस्त्र लढा देणारे वसंतदादा, सांगलीच्या गणेशदुर्ग येथे असणाऱ्या तुरुगांत कैदी होते. त्याच दिवशी त्यानी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तुरुंगाभोवतीच्या तटावरुन अुड्या मारुन पलायन केले होते. राजकीय संघर्ष तीव्र होत होता. राजेसाहेबानी प्रजेला हळूहळू अधिकार देत देत १९४६ मध्ये राज्यसभेस पूर्ण जबाबदार राज्यपध्दतीचे अधिकार दिले. संपूर्ण देशात चालू असलेल्या संघर्षाला यश येऊन अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. बदलत्या काळाची पावले ओळखून सांगलीच्या राजेसाहेबानी आपणहून विलिनीकरणास मान्यता दिली. ८ मार्च १९४८ रोजी सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. पटवर्धन राजघराण्याची जवळजवळ १५० वर्षांची सत्ता संपुष्टात आली.

 तत्कालीन मुंबई राज्यात जे अनेक जिल्हे अस्तित्वात आले, त्यातील दक्षिण सातारा जिल्ह्याची सांगली राजधानी झाली. सांगली जिल्हा नंतर अस्तित्वात आला. हातात बंदूक घेऊन ब्रिटीश सत्तेबरोबर लढणारे वसंतदादा आता नवराष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत गुंग झाले. त्यांच्या नेतृत्वाने राजकीय क्षितिजावर सांगलीचे नाव सर्वत्र दुमदुमू लागलं. व्यापारास प्रोत्साहन मिळून नवीन मार्केट यार्ड निर्माण झाले. शेतकरी सहकारी साखर कारखाना अभा राहिला. १९६३ मध्ये सांगलीला आकाशवाणी केंद्र सुरु झालं. सांगलीचे वसंतदादा नव्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले; एकदा नव्हे तर चारदा! सांगलीचा सर्वांगीण विकास सुरु झाला. वसंतदादाच्या नेतृत्वामुळे सांगलीच्या पूर्वीच्या पटवर्धन घराण्यातील तीन अधिपतींनंतर, ते सांगलीचे चौथे अनभिषिक्त राजेच गणले जाऊ लागले !

 म्हणून तर सांगलीसंबंधात बोलताना सर्वजण कौतुकाने म्हणत,

"चिंतामणराये वसविली
वसंतराये विकसविली । "

 सहा गल्लयांच्या छोट्या झऱ्यानं सुरु झालेला सांगलीचा अितिहास आता महापालिकेच्या महासागरात प्रवेश करता झाला आहे!

X-X-X

सांगली आणि सांगलीकर..............................................................५