पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सगळेच लावतात. पण सुंदर सांगलीचा पहिला ध्यास त्यांनीच घेतला होता! त्यासाठी त्यांनी सांगलीत जागोजागी बागांची, आमरायांची रचना केली. त्यांच्यानंतर गादीवर आलेल्या तात्यासाहेबांच्या कारकीर्दीत, सांगली म्युनिसिपालिटीची १८७६ मध्ये स्थापना झाली. आधुनिक सांगलीचा खरा पाया घातला गेला, तो मात्र १९०३ साली गादीवर आलेल्या प्रागतिक आणि अदारमतवादी दुसऱ्या चिंतामणराव आप्पासाहेब यांच्या कारकीर्दीत. सुरुवातीच्या काळात कॅप्टन बर्कसारखा कुशल अॅडमिनिस्ट्रेटर मिळाल्याने सांगली-मिरज रेल्वे १९०७ साली सुरु झाली. १९०८ साली वखारभागाची स्थापना झाली. या दोन्ही गोष्टींमुळे सांगलीतील व्यापाराची आणि अुद्योगधंद्याची वाढ झाली. दांडेकर,भिडे,वेलणकर,लड्डा वगैरे मंडळीमुळे आणि राजेसाहेबांच्या सक्रिय प्रोत्साहनामुळे सांगलीत प्रथमच यंत्रोद्योग-वस्त्रोद्योगाचा पाया घातला गेला. विठ्ठलदास शेडजी, नारायणदास शेडजी, अथणीकर, आरवाडे मंडळींमुळे तेल गाळण्याच्या, हळद पॉलिश करण्याच्या गिरण्या अभ्या राहिल्या. १९१२ नंतर सांगलीत लोकांना पहिल्यांदा घरातल्या घरात बसून पिण्याचे पाणी मिळू लागले. पाण्यासाठी विहीर जवळ करायची हा शिरस्ता बदलला ! १९१४ साली कृष्णा नदीला महापूर आला होता. गावात होड्या चालल्या. तेव्हा पुराच्या पाण्यापासून सुरक्षित अंतरावर वस्ती न्यायचे प्रयत्न सुरु झाले. त्यातूनच शिवाजीनगर (एक्स्टेंशन) भागाकडे वस्ती वाढू लागली. राजेसाहेबांनी स्वस्त किमतीत प्लॉटस् पाडून लोकांना त्या बाजूला घरं बांधण्यास मदत केली. सांगलीची वस्ती वाढू लागली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगलीच्या विद्यार्थ्याला पुण्या-मुंबईकडे धाव घ्यावी लागायची. १९१९ मध्ये राजेसाहेबानी स्वतः पुढाकार घेऊन विलिंग्डन कॉलेजच्या स्थापनेस हातभार लावला. १९२० साल हे वर्ष सांगलीच्या इतिहासात, अशा अर्थानं भाग्याचं की लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी अशा दोन्ही महापुरुषांचे पाय त्या वर्षी सांगलीला लागले. त्या दोघांच्या स्वातंत्र्य चळवळीचे पडसाद सांगलीत अुमटू लागले. कॉलेज शिक्षणामुळे सुशिक्षितांमध्ये स्वातंत्र्याचं वारं खेळू लागलं. परिणामी, दक्षिणी संस्थान प्रजा परिषदेची चळवळ १९२२ पासून सांगलीत जोमाने सुरु झाली. मुळात बर्कसाहेबानी सुरु केलेल्या, रयतसभेला १९३० मध्ये राजेसाहेबानी नियमबध्द स्वरुप दिलं. राजा विरुध्द प्रजा असा संघर्ष सुरु झाला. ब्रिटीश राजवटीमुळे, आणि त्यांच्या दडपणामुळं, वरकरणी विरोध दिसला, तरी आतून प्रजेच्या चळवळीला राजेसाहेबांची सहानुभूतीच होती. त्यामुळेच सांगलीत गुप्तपणे राहून वसंतदादा पाटील यांची स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भूमिगत चळवळ जोमाने सुरु होती. अनेक अखिल भारतीय कीर्तीचे पुढारी, आश्रयासाठी ब्रिटीश सरकारची नजर चुकवून सांगलीत आश्रय घेत असत. अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली अशा १९४२ च्या विख्यात क्रांतिवीरांचे पाय त्यामुळे सांगलीला लागले.


सांगली आणि सांगलीकर..............................................................४