पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सांगली राजधानीचं ठिकाण बनवल्यावर चिंतामणरावानी १८०४ - ५ च्या सुमारास 'गणेशदुर्ग' या भुईकोट किल्लयाच्या बांधकामास सुरुवात केली. पटवर्धन घराणं गणपतीचे अपासक. या घराण्याचे मूळ पुरुष, कोकणातल्या कोतवडे गावचे हरभट्ट पटवर्धन. त्यानी तर १२ वर्षे दुर्वांचा रस प्राशन करुन श्रीगणपतीपुळे या क्षेत्रस्थानी श्री गणेशाची निस्सीम अपासना केली होती. तेव्हा राहायला राजवाडा झाला मग पूजेसाठी गणपतीमंदिर हवंच ना ? आज सांगलीचे भूषण समजल्या जाणाऱ्या या श्रीगणपतीमंदिराच्या बांधकामाला इ.स. १८११ साली सुरुवात झाली आणि तब्बल तीस वर्षे ते काम चालू होतं. श्रीगणपतीपंचायतन म्हणजे शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मी-नारायण आणि गणपती. असं पाच मूर्ती असलेलं गणपतीमंदिर अभावानेच आढळते. पाचहि मूर्ती संगमरवराच्या आहेत. हा संगमरवर श्रीक्षेत्र महाबळेश्वराहून, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आणलेल्या संगमरवरापैकी आहे.

 अिकडं गणतीमंदिराचं काम चालू होतं तेव्हा राजकीय क्षितिजावर फार मोठ्या घडामोडी घडत होत्या. १८१८ मध्ये पेशवाईचा पाडाव झाला. तेव्हा ब्रिटीशानी, पेशव्यांच्या सर्व सरदारानी आपल्या चाकरीत यावं असं फर्मान काढलं. चिंतामणराव आप्पासाहेब मोठे मानी पुरुष होते. त्यांनी नोकरी करण्यास नकार दिला. इंग्रजांबरोबर सरळ सरळ भांडण काढले. झालं. इंग्रजांच्या फौजा जनरल प्रिट्झलरच्या नेतृत्वाखाली सांगलीवर चाल करुन आल्या! सांगलीच्या इतिहासात एकमेव असा लढाईचा प्रसंग अभा ठाकला. अर्थात हा अगदीच असमान सामना होता. आप्तमंडळीनी आणि दरबारी लोकानी चिंतामणरावांची समजूत काढली, तेव्हा कुठं इंग्रजांबरोबरीतील तहास ते तयार झाले. मात्र चाकरी न करण्याचा त्यांचा हट्ट कायम होताच. तडजोड म्हणून त्याना सांगली संस्थानचा हुबळी, तडस, बरडोल (हा सर्व भाग कर्नाटकातील. संस्थानचा काही प्रदेश कर्नाटकात होता) असा एक लाख, अडतीस हजाराचा मुलुख, कायमचा ब्रिटीशांच्या घशात घालावा लागला ! अत्यंत स्वाभिमानी असणारे चिंतामणराव नंतरच्या काळातहि या ना त्या कारणांवरुन नेहमी ब्रिटीशांशी संघर्षाच्या भूमिकेतच असत. एरवी मात्र ते कमालीचे प्रजाहितदक्ष होते. सांगलीच्या भरभराटीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पध्दतशीर पेठा रचून सांगलीत व्यापारास त्यानी अत्तेजन दिले. व्यापाऱ्यांना अनेक सवलती दिल्या. अनेक शास्त्री - पंडित, कलावंत सांगलीत बोलावून घेतले. परंपरेचे अभिमानी असले तरी इंग्रजांमुळे आलेल्या आधुनिकतेचेहि त्याना आकर्षण होते. त्यामुळेच १८२१ मध्ये त्यानी सांगलीत शिळा- प्रेस छापखान्याची स्थापना केली. टांकसाळ सुरु करुन नाणी पाडण्यास सुरुवात केली. त्यांच्यामुळेच मराठी रंगभूमीवर पहिले मराठी नाटक 'सीतास्वयंवर' अभे राहिले. विष्णुदास भावे यांना, त्यानीच पाठीमागे लागून, हे नाटक लिहायला लावले. सुंदर सांगलीचे नारे


सांगली आणि सांगलीकर...............................................................३