पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काम करीत आहे. मालाच्या चोखपणाकडे आणि नाविन्याकडे जसं गाडगीळ मंडळींचं लक्ष असतं, तसंच नवीन कुशल कारागीर तयार करण्याकडेही त्यांचे बारीक लक्ष असते; त्यामुळेच कौशल्यपूर्ण कारागिरांच्या पिढ्या न पिढ्या गाडगीळांच्या पेढीवर काम करताना आढळतात. काही जणानी तर गाडगीळांपासून स्फूर्ती घेऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसायही सुरू केला आहे. या पेढीने सामाजिक बांधिलकीची जाणीव मनात सजग ठेवली आहे. अनेक चांगल्या सामाजिक, शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहाय्य दिलं आहे. सांगली बँकेवर संस्थानी काळात एकदा गंडांतर आले होते. मुंबईच्या दोन व्यापाऱ्यांनी दिवाळे काढून बँकेला गोत्यात आणले. साहजिकच ठेवीदारांनी घाबरून गर्दी केली. सांगलीचे राजेसाहेब, ज्यानी ही बँक स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता, ते महाबळेश्वरास गेले होते. अशा वेळी या गाडगीळ पेढीने भरपूर रोकड बँकेकडे पाठवली. त्यामुळे बँकेवरील आपत्ती टळली ! 'एकदा विश्वास ढासळला की सर्वनाश' हे परम सत्य प्राणापलीकडे जपल्यामुळेच, ही पेढी आता द्विशतकाकडे दिमाखात वाटचाल करीत आहे. ७) मे. गोविंदराम शोभाराम आणि कंपनी : सांगलीची गणपती पेठ नेहमीच गजबजलेली दिसते. मसाल्याचे पदार्थ, हळद, नारळ, चहा, धान्ये व इतर किराणामाल यांची ही प्रमुख बाजारपेठ आहे. तांदुळवाले लिमये, माने आणि कंपनी, उपलेटावाला, मथुरादास मगनलाल अशा अनेक पेढ्या येथे फार जुन्या काळापासून कार्यरत आहेत. त्यापैकी एक १०० वर्षांपूर्वीची जुनी पेढी म्हणजे 'मे. गोविंदराम शोभाराम आणि कंपनी' ही आहे. १८९० गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वसई डाबला गावातून आलेले श्रीमान शेठ लल्लूभाई गोविंदराम शाह आणि शेजारच्या गावातून आलेले श्रीमानशेठ मथुरादास मगनलाल व श्रीमान शेठ साखळचंद बबालाल या तिघांनी भागिदारीमध्ये 'गोविंदराम शोभाराम आणि कंपनी' ही किराणा मालाचा घाऊक व्यापार करणारी सुरु केली. १९४४ मध्ये या पेढीतील तीन भागीदारांच्या वाटण्या झाल्या व गोविंदराम शोभाराम आणि कंपनीची सूत्रे लल्लूभाईंचे सुपुत्र पुरुषोत्तमदास शेटजींकडे आली. मेहसाण्याहून सांगलीला आलेले हे कुटुंब व गोविंदराम शोभाराम ही पेढी खऱ्या अर्थाने आज सांगलीकर झाली असून सांगलीच्या सामाजिक कार्यात सहभाग देऊन आणि व्यापाराच्या माध्यमातून ते सांगलीच्या वैभवात भर घालीत आहेत. सध्या सांगलीतील गोविंदराम शोभाराम आणि कंपनीचा व्याप स्व. पुरुषोत्तमदास शेटजींचे नातू महेशभाई, किरीटभाई व किरीटभाईंचे सुपुत्र राजेशभाई हे पाहतात. सांगली आणि सांगलीकर. • २४७