पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजहि सांगली, चांगली देखणी दिसते ती प्रसन्न गणपतीमंदिरामुळे; भक्कम बांधणीच्या आयर्विन ब्रिजमुळे, गणेशदुर्ग' सारख्या भुईकोट किल्ल्यामुळे, वैशिष्ट्यपूर्ण वस्तुसंग्रहालयामुळे, घनदाट आमराईमुळे. हे ठसठशीत “अलंकार” सांगली नगरीच्या अंगावर कुणी घातले? आधुनिक, वैभवशाली सांगलीचा पाया कुणी घातला?

 त्यासाठी सांगलीच्या इतिहासाचा मागोवा घ्यायला हवा.

 प्रत्येक गावाला स्वतःचा असा काही चेहरा-मोहरा असतो. स्वतःची अशी काही ओळख असते. खरं तर १८०१ सालापूर्वी 'सांगली' ला स्वतःचा असा काही चेहरा नव्हताच. मात्र गावच अस्तित्वात नव्हतं असं नाही. पूर्वीचे संदर्भ बघितले तर इ.स. १०२४ पासून अल्लेख आहेत. 'गोंक' या शिलाहार राजाच्या ताब्यात 'मिरिंच ' म्हणजे मिरज आणि 'करहाटक' म्हणजे कराड प्रांत होता. त्यात ही सांगली होती. या भागावर देवगिरीकर यादव, नंतर मुसलमानी राजे यांची सत्ता होती. सांगलीचा ठसठशीत अल्लेख 'शिवभारत' या संस्कृत काव्यात आढळतो. इ.स. १६५९ मध्ये शिवछत्रपतींचा पराक्रमी सरनौबत नेताजी पालकर याने सांगली, मिरज, ब्रम्हनाळ ही गावे आदिलशहाकडून जिंकल्याचे अल्लेख आहेत. पेशव्यांच्या काळात इंद्रोजी कदम आणि नंतर पटवर्धन सरदारांकडे या भागाची जहागीर होती. मिरज जहागिरीच्या २२ कर्यातीपैकी सांगली ही एक कर्यात होती. जवळजवळ असलेल्या तीन-चार गावांना मिळून 'कर्यात' म्हणत.

 सांगली गावाच्या नावाविषयी अनेक समजुती आहेत. कृष्णा नदीच्या काठी एका अंचवट्यावरील सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे 'सांगली' ही त्यातल्या त्यात सर्वमान्य समजूत. काहींच्या मते या गावाचं मूळ नाव 'संगळकी' असं कर्नाटकी पध्दतीचं होतं, तर दुसरी समजूत अशी की कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम गावाला जवळ असल्यानं, मूळ गाव 'संगमी' होतं. मग अपभ्रंश होऊन गावाचं नाव सांगली झालं.

 सांगली गावाचा अितिहास म्हणजे तो एक प्रकारे पटवर्धनी पराक्रमाचाच अितिहास. मूळचा ओबडधोबड असलेला सांगली गावाचा चेहरा राजबिंडा आणि वैशिष्ट्यपूर्ण बनला तो या पटवर्धनांमुळेच. १८०१ साली मूळ मिरज जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यानी आपलं वेगळं राज्य बनविलं, त्याची राजधानी सांगली बनवली, तेव्हापासून या गावाचा, खऱ्या अर्थाने अतिहास सुरु झाला. आज कुणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण १७६८ च्या सुमारास हरिपूर सांगलीच्या दुप्पट मोठं गाव होतं. त्यावेळी सांगलीची वस्ती एक हजार तर हरिपूरची दोन हजार होती !


सांगली आणि सांगलीकर..............................................................२