पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्रासदायक होऊ लागले, तसतसा गावाचा विस्तार खणभाग, शिवाजीनगर असा वाढत गेला; आणि पर्यायाने नगरपालिकेचा अधिकारहि ! १९१४ च्या महापुरानंतर आणि १९१९ च्या विलिंग्डन कॉलेजच्या स्थापनेनंतर, सांगली, मिरज - रस्त्याच्या बाजूला वाढू लागली. १९२९ मध्ये आयर्विन ब्रिज झाल्यावर सांगली नगरपालिकेची कक्षा पश्चिमेकडील भागात विस्तारली; मात्र अत्तर दिशेच्या शेरी नाल्यामुळे सांगलीची त्या बाजूची वाढ मर्यादितच राहिली. सुरुवातीच्या काळात नगरपालिकेसंबंधात काही मनोरंजक घटना आढळतात. १८७१ च्या सुमारास, कसबीणपट्टी नावाचा कर बसवण्यात आला होता. शहरातील नायकिणी आणि वेश्या यांजकडून त्यांच्या अत्पन्नाच्या (?) मानाने दरसाल १ रूपया ते ५ रूपयांपर्यत कर घेतला जात असे; अर्थात् लौकरच हा कर रद्द करण्यात आला ही गोष्ट वेगळी. १८९६ च्या सुमारास म्युनिसिपालिटीच्या चेअरमनला म्हणजे ‘सरपंचास’ आपल्या दप्तरात कामकाजासाठी येण्यासाठी, वाहन म्हणून घोडा ठेवण्याची मुभा होती. आणि या घोड्यासाठी म्युनिसिपालिटी दरमहा १५ रु घोडेभत्ता म्हणून देत होती ! १८८७ मध्ये प्रथमच सांगली गावाला काकडवाडीहून सायफन पद्धतीने स्वच्छ पाणी-पुरवठा सुरु झाला. १८९८ मध्ये सांगली गावात पहिली मोठी प्लेगची साथ आली. पंधरा-सोळा हजाराच्या त्यावेळच्या लोकवस्तीत २१५९ माणसं दगावली! लोकवस्तीच्या मानाने ही मोठीच हानी होती. नंतरहि बरीच वर्षे प्लेगच्या साथीचा त्रास सांगलीला होत होता. नगरपालिका सुरुवातीला नदीच्या बाजूच्या धर्मशाळेत होती. १९१७ मध्ये नगरपालिका स्वतःच्या इमारतीत आली. (म्हणजे सध्याची जुनी बिल्डिंग) अॅड्मिनिस्टेटर बर्क यांच्या पुढाकाराने सांगलीची शोभा वाढवणाऱ्या बऱ्याच इमारती बांधल्या गेल्या. सांगली नगरपालिकेला निवडणुकीचा हक्क पहिल्यांदा १९०५ साली मिळाला. त्यावर्षीच्या १५ ऑक्टोबरला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी लोकांनी निवडून दिलेल्या सदस्यांची संख्या ७ होती तर सरकारनियुक्त सभासद ११ होते. १९०७ साली पहिला बिनसरकारी अध्यक्ष निवडण्यात आला. स्थानिक स्वराज्याचे हक्क विस्तृत होऊन १९३८ मध्ये प्रजेला भरीव प्रमाणात हक्कदानाची घोषणा सांगलीच्या राजेसाहेबानी केली. त्यानुसार १९३९ साली लोकांनी निवडून दिलेला अध्यक्ष नगरपालिकेला असावा, म्हणून नगरपालिकेत क्रांतीकारक घटना दुरुस्ती करण्यात आली. १९४७ मध्ये सांगली शहरासाठी प्रथमच मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. १९४८ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सांगली संस्थानच्या विलिनीकरणाच्या वेळी सांगलीच्या राजेसाहेबानी रु. ३५ लाखाचा ट्रस्ट करून सांगली नगरपालिकेच्या स्वाधीन केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तर नगरपालिकेच्या कामाची घोडदौडच चालू झाली. सांगली आणि सांगलीकर.. . २४१