पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सांगली - एके काळची रम्य नगरी



 "कृष्णाकाठी कुंडल आता पहिले अुरले नाही" असं कविश्रेष्ठ गोविंदाग्रज तथा राम गणेश गडकरी म्हणून गेलेत. निसर्ग नियमानुसार सृष्टीत परिवर्तनं ही होतच राहणार. लहानपणी गुटगुटीत, गुबगुबीत गालाच्या गोंडस बाळाला, सदासर्वकाळ आपण त्या मनोहर रुपात पाहू शकत नाही. त्याला कोणाचाच अिलाज नाही. तरीपण गोविंदाग्रजांसारखी “ कृष्णाकाठी सांगली, नाही अुरली चांगली " असं म्हणण्याची वेळ सांगलीकरांवर कधी न येवो !

 सुदैवाने जुन्या-नव्या मंडळींबरोबर थोडी बातचीत केली तर सांगली पार बदलून गेली आहे असं वाटत नाही. आपला मूळचा सतेज चेहरा, या गावानं बराचसा शाबूत ठेवलाय ! निदान महाराष्ट्रातील अनेक गावांची पडझड बघितल्यावर असं वाटतं खरं!

 एखाद्या साठी-सत्तरीच्या सांगलीकराशी गप्पा मारल्या की जुन्या सांगलीच्या कौतुकात आपण हरवून जातो. कृष्णाकाठचा घोटीव घाट, बाजूची रम्य वनश्री, संथ वाहणारी कृष्णामाई. असंच काठाकाठानं गेलं की सांगली - हरीपूर रस्त्याच्या मध्यावर दिसणारा तो बागेतील गणपती, ती घनदाट चिंचेची बनं, पेरुच्या बागा, आणि थोडं चालल्यावर हरिपूरची वेस ओलांडल्यावर दिसणारा, कृष्णा वारणेचा सुरेख संगम. शेजारी पवित्र आणि गंभीर वातावरण निर्माण करणारं श्रीसंगमेश्वराचं ऐतिहासिक मंदिर. नुसतं त्या संगमाच्या काठावर अभं राहिलं, नदीकाठाला बिलगलेली हिरवीगार झाडं बघितली, अुभ्या पिकांची वाऱ्यानं होणारी सळसळ ऐकली आणि नदीवरुन येणारा गार गार वारा नाकातोंडात भरुन घेतला की पैशा- अडक्याच्या व्यावहारिक जगात अडकलेलं आपलं मन नकळत काव्यमय होतं. मग मुळातच प्रतिभेचं लेणं घेऊन सांगली परिसरातच जन्मलेल्या गोविंद बल्लाळ देवलाना “जय कृष्णा तटवासाऽ" का म्हणावसं वाटणार नाही ?

 आज ती चिंचेची घनदाट बनं नाहीत, पेरुच्या बागा नाहीत, जागोजागी पाणी अडविल्यामुळे कृष्णेला येणारे महापूर नाहीत, संकष्टीला "धुडडुम" आवाज करुन सगळ्या गावाला चंद्रोदय झाल्याचं सांगणाऱ्या तोफा नाहीत, गणपतीच्या दिवसातले छबिने नाहीत की नगारखाने नाहीत. गतवैभव काळाच्या ओघात नष्ट होणारच. पण


सांगली आणि सांगलीकर...............................................................१