पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतं. सांगलीत आल्यावर जी वास्तू त्यानी खरेदी केली आणि जिथं या सप्तसुरांचं वास्तव्य होतं ती वास्तू ‘दीनानाथ चाळ' म्हणूनच ओळखली जाते. (आजही ती वास्तू सांगलीच्या एस.टी. स्टँडजवळ अभी आहे). सांगलीच्या वास्तव्यात आपल्या तडफदार गायनशैलीने आणि अंच खणखणीत आणि भिंगरीसारखी फिरत असलेल्या असामान्य आवाजाने, मा. दीनानाथानी मराठी रंगभूमी दणाणून सोडली. सांगलीचं आजचं 'सदासुख' थिअटर हे सुरवातीला नाटकाचे थिअटर होतं. या सदासुखमध्ये आठवड्याला एक नाटक याप्रमाणे सतत आठ वर्षे दीनानाथानी आपल्या 'बलवंत नाटक मंडळी तर्फे' नाटके सादर केली. त्यांचं एक मोठं वैशिष्टय म्हणजे त्यांची राष्ट्रीय वृत्ती. त्यामुळे मानापमान, भावबंधन, सौभद्र यासारख्या पारंपारिक नाटकांबरोबरच त्यानी स्वातंत्र्यवीर सावरकर, वीर वामनराव जोशी यांची राष्ट्रीय वृत्ती जोपासणारी नाटके केली. 'परवशता पाश दैवे' यासारखे गाणे पारतंत्राच्या काळात म्हणणे धाडसाचे होते. ते धाडस दीनानाथानी दाखवले. एकीकडे साक्षात बालगंधर्व आणि दुसरीकडे केशवराव भोसले यांच्यासारखे चंद्रसूर्य मराठी नाट्यसृष्टीत तळपत असताना सुद्धा दीनानाथानी रसिकमनांवर आपल्या स्वतंत्र गायनशैलीचा ठसा अमटवला हे मुद्दाम लक्षात आणून दिले पाहिजे. नाट्यसृष्टीवर चित्रपटसृष्टीचे आक्रमण होऊ लागले तेव्हा त्याचा विपरीत परिणाम सर्वच नाट्यसंस्थांवर झाला. आपली नाटकसंस्था बंद ठेवून दीनानाथानी, विश्राम वेडेकर, चिंतामणराव कोल्हटकर, वा. ना. भट वगैरेच्या साहाय्याने 'बलवंत पिक्चर्स' नावाची संस्था, कृष्णाकाठी, गणपती मंदिराच्या पिछाडीला स्थापन केली. सांगली - हरिपूर भागात शूटींग करुन 'कृष्णार्जुनयुद्ध' नावाचा सिनेमा तयार केला. मोठी जाहिरात केली. पण दुदैवाने सिनेमा साफ कोसळला. कंपनी कर्जबाजारी झाली. सावकारांचे तगादे लागले. कोर्टकचेऱ्या सुरु झाल्या. प्रतिकूल परिस्थितीशी दीनानाथाना झगडा करावा लागला आणि त्यातच अवघ्या ४२ व्या वर्षीच त्याना मृत्यूच्या आधीन व्हावे लागले हे त्यांचे आणि नाट्यरसिकांचे दुर्दैव. दीनानाथ अकाली गेले पण मराठी रसिकांसाठी एक मोठा कल्पवृक्ष लावून गेले. लता, मीना, आशा, अषा आणि हृदयनाथ या मुलांच्या रुपाने फार मोठी संपत्ती त्या 'शापित यक्षाने' आपल्यामागे ठेवली. या पाच भावंडापैकी, आशा भोसले, अषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मच मुळी सांगलीत झाला. लता मंगेशकर सर्वात मोठ्या. साहजिकच अितर भावंडांच्या तुलनेत त्याना दीनानाथांचा सहवास अधिक लाभला. लताबाईंची सांगितिक जडणघडण त्यामुळे सांगलीतच झाली. पुढे आयुष्यात लंडनमधील आल्बर्ट हॉल गाजवणाऱ्या लताबाईनी आपल्या बालपणात, सांगली जिमखाना हॉल गाजवून आपल्या भावी कर्तृत्वाची झलक दाखवली होती. कर्तबगार वडिलांचा वारसा पुढील पिढीला सांभाळता येतोच असं नाही. पण सांगली आणि सांगलीकर.. २२३