पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वसंतदादांचे ६वी, ७ वी चे शिक्षण नंतर सांगलीच्या १ नंबर शाळेत झाले. १९३४ साली त्या काळी अस्तित्वात असलेली व्ह. फा. (व्हर्नाक्युलर फायनल ) परीक्षा ते पास झाले. त्याच सुमारास त्यांची कोर्ट ऑफ वॉर्ड्सकडे असलेली वडिलोपार्जित जमीन मोकळी झाली. त्यामुळे वसंतदादानी घरच्या शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली. मन लावून ते शेतात राबू लागले. दहा दहा बैलांच्या नांगरांवर त्यानी नांगरट केली. कुळवणी केली. गवत कापून सांगलीच्या शनिवारच्या बाजारात विक्री केली. या अनुभवामुळे त्यांचे शेतीचे आणि शेतीमाला- विषयाचे ज्ञान डोळस बनले. शेतकऱ्यांच्या कष्टाळू जीवनाची आणि त्यांच्या अडीअडचणींची त्याना यथार्थ कल्पना आली. या प्रत्यक्ष ज्ञानाचा त्यांना भावी आयुष्यात फार अपयोग झाला. पारतंत्र्य असल्याने आजूबाजूला बऱ्याच घटना घडत असत. त्यामुळे एकीकडे त्यांची शेती चालू असली तरी दुसरीकडे त्यांचे मन राजकीय घडामोडींचा वेध घेण्यात गुंतलेले असे. सांगली शहरातून येणारी माणसे, वर्तमानपत्रे, यांच्या सतत संपर्कात ते रहात असत. त्यांच्या नेतृत्वगुणाची चुणुकही याच दिवसात दिसून आली. कृष्णा नदीस दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे काठावर अतोनात चिखल होई. पाणी आणताना गावकऱ्यांना त्रास होई, कपडे धुताना स्त्रियांचे हाल होत. वसंतदादानी त्यावेळी पुढाकार घेऊन, समस्त गावकऱ्यांना श्रमदानासाठी एकत्र केले. नदीकाठी घाट बांधला. हे त्यांचे पहिले सामाजिक कार्य म्हणायला हरकत नाही. १९३५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात, पं.जवाहरलाल नेहरूंचा सातारा-कराड भागात दौरा झाला. त्यामुळे जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली. चैतन्याचे वारे वाहू लागले. वसंतदादांनी पद्माळे येथे काँग्रेस कमिटी स्थापन केली. त्यांचे तडफदार कार्य पाहून लौकरच त्याना तासगाव तालुका काँग्रेसचे सेक्रेटरी करण्यात आले. वसंतदादा आता तालुक्याच्या राजकारणात भाग घेऊ लागले. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याच्या कामामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला. त्या पारतंत्र्याच्या काळात काँग्रेसची कामे करणे जोखमीचे होते. सतत पोलिसांची नजर असे. घरच्या आघाडीवर मात्र दादाना, थोरल्या भावाचा, शामरावांचा भक्कम पाठिंबा होता. ते संतप्रवृत्तीचे होते. वेळोवेळी हाल सोसून त्यांनी आपल्या धाकट्या भावाला, वसंताला, स्वातंत्र्यलढ्याच्या कामात नेहमी प्रोत्साहनच दिले. १९४० नंतर स्वातंत्र्यलढा निर्णायक स्वरुपात सुरु झाला. याच काळात म.गांधीनी वैयक्तिक सत्याग्रहाची हाक दिली. पहिले सत्याग्रही म्हणून विनोबाजी भावे यांची निवड झाली. तासगाव तालुक्यातून वसंतदादांची निवड झाली होती. त्यावेळी त्याना पहिल्यांदा तुरुंगवास घडला. सहा महिन्याची सक्त मजुरी झाली होती. सांगली आणि सांगलीकर.. ..२११