पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अत्यंत नगण्य गाव. पण आप्पासाहेबानी सांगली राजधानी केल्यावर, प्रयत्नपूर्वक आणि योजनाबद्ध रीतीने तिची वाढ केली. शास्त्री, पंडित, हरहुन्नरी कारागीर, वैद्य, व्यापारी अशा सर्वांना सवलती देऊन त्यानी सांगलीत आणले. त्यामुळे सांगलीची मोठ्या प्रमाणावर भरभराट होत गेली. त्यांची गुणग्राहकता फार मोठी होती. त्यासाठी विष्णुदास भावे हे एकच अदाहरण पुरेसे आहे. मराठी नाटकाचे जन्मदाते म्हणून त्याना आपण श्रेय देतो, त्यापैकी निम्मे श्रेय आप्पासाहेबाना दिले पाहिजे. मराठी नाटक लिहिण्याची आणि रंगभूमीवर आणण्याची संपूर्ण प्रेरणा, त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ, नाटकात नटवर्ग मिळविण्यासाठी त्यानी सर्वसामान्यांना देऊ केलेली बक्षिसे हे सर्व पहाता, विष्णुदासांच्या बरोबरीने मराठी रंगभूमीच्या जनकत्वाचे रास्त श्रेय आप्पासाहेबानाच द्यायला हवे. या गुणग्राहकतेमुळेच त्यांच्या पदरी गोपिनाथदादा आगाशे यांचेसारखे मोठे शास्त्री, सखारामबुवा गोडसे यासारखे गवई, अशी मंडळी होतीच, पण त्याचबरोबर 'कुमारी', 'मोतापा' घाटाची भांडी बनवणारे कुशल तांबट, गणपतीची सुबक मूर्ती बनवणारे मुकुंदा पाथरवट अशी गुणी माणसं पण त्यांच्याकडे होती. १८३४ साली सांगलीत नाणी पाडण्यासाठी आप्पासाहेबानी टांकसाळ सुरु केली. त्याआधी १८२१ मध्ये पहिला छापखाना सुरू केला तो पदरी बाळगलेल्या अशा गुणी माणसांच्या बळावरच ! १५ जुलै १८५१ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी या स्वाभिमानी, गुणग्राही, कल्पक, दीर्घोद्योगी आणि पराक्रमी राजाचे निधन झाले. आज सांगली दोनशे वर्षाची होत आहे. अनेक क्षेत्रात सांगलीचं नाव दुमदुमत आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा विविध स्तरांवर सांगलीचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहेच पण हळदीमुळे अभ्या देशात सांगलीचे नाव सर्वतोमुखी आहे. या साऱ्या भरभराटीच्या मुळाशी श्रीमंत चिंतामणराव ( थोरले) आप्पासाहेब पटवर्धन हा थोर राजा आहे. त्यामुळे आज सांगलीच्या २०० व्या वाढदिवस- वर्षात त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवणे समयोचित ठरेल; नव्हे, सांगलीकरांचे ते पवित्र कर्तव्यच आहे. सांगली आणि सांगलीकर... २०८