पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घ्यावयाची होती. ही गोष्ट आप्पासाहेब वारंवार कंपनी सरकारच्या नजरेस आणून देत होते. त्याच्या पुढे जाऊन त्यानी इंग्रजांना ठणकावले की याच कराराचा दुसरा अर्थ असा होतो की आम्ही फक्त पेशव्यांची चाकरी करण्यास बांधील आहोत; अितर कोणास नाही. हा सर्व पत्रव्यवहार मुळातून पाहाण्यासारखा आहे. त्यातून आप्पासाहेबांची स्वाभिमानी वृत्ती, सडेतोड बाणा प्रकट होतो. पोरस राजा, सिकंदर बादशहासमोर ज्या ठामपणे अभा राहिला, तसेच आप्पासाहेब इंग्रजांसमोर राहिलेले दिसतात. अर्थात् हा सामना, असमानांचा होता. पत्रापत्री करून आप्पासाहेब काही नमत नाहीत हे बघून इंग्रजानी, जनरल प्रिट्झलर याला फौज देऊन सांगलीकडे रवाना केले! मग मात्र सर्व आप्तेष्ट, हितचिंतक, कारभारी मंडळी यानी आप्पासाहेबांची समजूत घातली. तेव्हा कुठं ते इंग्रजांबरोबर तह करण्यास राजी झाले. नोकरी ( इंग्रजांची) न करण्याचा त्यांचा हेका मात्र त्याना चांगलाच महागात पडला. त्याबद्दलची नुकसान- भरपाई म्हणून त्याना, आपल्या जहागिरीपैकी नवी हुबळी, तुरूम आणि बरडोल हे रु. १,३५,०००/- चे तालुके कायमचे इंग्रजांच्या घशात घालायला लागले! इतके होऊनही आप्पासाहेबांचा इंग्रजांबरोबर वागण्यातील ताठा मात्र कमी झाला नाही. त्यांचा पहिला मुलगा गेल्यावर त्यानी एक मुलगा दत्तक घेतला होता, तो इंग्रजानी मान्य केला नाही. इंग्रजांच्या काही गुन्हेगारांस, (बाबाजी चिमणाजी गोखले प्रकरण) आप्पासाहेबानी आपल्या मुलुखात राजरोस आश्रय दिला; अशा कारणांवरून त्यांचे इंग्रजांबरोबर खटके अडतच होते. कालांतराने, दोन्ही बाजूंचा विरोध मावळत गेला. गव्हर्नर माल्कम आल्यावर तर संबंधात बरीच सुधारणा झाली. विशेषतः कोल्हापूर संस्थानात १८४४ मध्ये जे बंड झाले होते, त्याप्रसंगी आप्पासाहेबानी इंग्रज सरकारला लष्करी मदत केली. त्याबद्दल इंग्रज सरकारने १५ नोव्हेंबर १८४६ रोजी बेळगाव येथे खास दरबार भरवून सर्व सन्माननीय अपस्थितांच्या समक्ष आप्पासाहेबांचा खास सत्कार केला. ‘गार्ड ऑफ ऑनर'ने त्याना सलामी देण्यात आली. सोन्याच्या मुठीची इंग्लंडमधून आणवलेली मौल्यवान तलवार त्याना थाटामाटात देण्यात आली. इंग्रजांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाल्यावर आणि गणपतीमंदिरात 'अर्चा' समारंभ झाल्यावर, सांगली संस्थानात नवीन नवीन सुधारणा करण्यास आप्पासाहेबाना मोठी अमेद आली. सांगली गावाच्या आधुनिकीकरणाकडे त्यानी स्वतः लक्ष पुरवले. मुंबईस बरेचदा आप्पासाहेबांचे जाणे होई. तेथील रस्त्यांप्रमाणे सांगलीत त्यानी चांगले, रुंद, सरळ रेषेत असलेले रस्ते आखून, रस्त्याकडेस झाडे लावण्यास सुरूवात केली. त्याना स्वतःला बागा, मळे, तलाव बांधण्याचा छंद होता. सांगलीत आणि सांगलीबाहेर सांगली आणि सांगलीकर. . २०६