पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे सांगलीकर आप्पासाहेब पटवर्धन चालून गेले. बऱ्याच चकमकी घडल्या. १० सप्टेंबर १८०० रोजी झालेल्या चकमकीत धोंडजी वाघाने, आप्पासाहेब, धोंडोपंत गोखले याना घेरले. कर्नाटकातील हल्याळ येथे मोठी लढाई झाली. धोंडोपंत गोखले आणि त्यांचा पुतण्या आप्पाजी गणेश, धोंडजी वाघाच्या तावडीत सापडले आणि त्या अभयतांना निर्घृणपणे मारण्यात आले. खुद्द आप्पासाहेब पटवर्धन यांच्या नाकावर तलवारीचा वार बसून नाक लोंबू लागले! अजव्या बरगडी आणि कुशीस तीन जखमा झाल्या. पण त्या स्थितीतही त्यानी युद्ध चालूच ठेवले. पुढे जनरल वेलस्लीने धोंडजी वाघाचा नाश केला. आप्पासाहेबांच्या शौर्याबद्दल पेशवे दरबाराने कौतुक केलेच पण वेलस्लीने त्यांच्या धैर्याची प्रशंसा केली. या युद्धामुळे आप्पासाहेबांची प्रतिष्ठा वाढली. बापू गोखले यांच्यासारखा पुढे इतिहासात गाजलेला सेनापतीही त्यांना मानू लागला. या दोन्ही युद्धांमधून सवड मिळताच १८०५ मध्ये आप्पासाहेबानी सांगलीत परतल्यावर गणेशदुर्गाचे काम सुरू केले आणि १८०७ पर्यत सर्व बांधकाम पूर्ण केले. चारी बाजूनी खंदक आणि एकूण सात बुरुज असलेला हा भुईकोट किल्ला म्हणजे सांगलीच्या वैभवात भर टाकणारी वास्तू आहे. मिरज जहागिरीतून, आप्पासाहेब बाहेर पडले तेव्हा असं म्हणतात की त्यांच्याजवळ फक्त सिंहासनारूढ ताम्र धातूची श्रीगणेशाची मूर्ती होती. त्यावेळी मनोमन त्यानी त्या मूर्तीची आराधना करून म्हटलं की सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या होऊ देत, मग मी तुझी प्रतिष्ठापना एका मंदिरात करेन. सुदैवाने तसंच झालं. आज सांगलीचे भूषण असणारे गणपतीमंदिर त्यामुळेच बांधले गेले. १८११ मध्ये सुरू झालेलं मंदिराचं काम तब्बल ३० वर्षे चालू होतं. बांधकाम पूर्ण झाल्यावर १८४४ मध्ये 'अर्चा' समारंभ एखाद्या लग्न कार्यासारखा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. एका बाजूला हे चालू असताना दुसऱ्या बाजूला राजकीय क्षितिजावर मोठ्या घटना घडत होत्या. १८१८ मध्ये इंग्रजानी पेशवाई पूर्णपणे संपुष्टात आणली. सातारकर छत्रपती, जे मराठी राज्याचे मूळ मालक ते नामशेष झाले. तेव्हा त्यांच्या सर्व सरदारांनी आपल्या चाकरीत यावे म्हणून इंग्रजानी जवळजवळ सक्तीच चालवली हाती. तसे फर्मानच त्यानी काढले होते. प्रत्येकजण तह करून आपले स्थान कायम करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यामध्ये आप्पासाहेब अपवादात्मक संस्थानिक होते. इंग्रजांची चाकरी करण्यास त्यांचे मानी मन बिलकूल तयार नव्हते. त्यानी इंग्रजांबरोबर बरीच वर्षे हुज्जत घातली. १८१२ साली जो पंढरपूरचा करार झाला होता, त्याप्रमाणे पटवर्धन सरदारानी पेशवे सरकारची नोकरी अमाने अितबारे करावी असा करार होता. त्याचबरोबर पेशव्यानी, पटवर्धन मंडळींचा मान राखावा, दर्जा राखावा आणि त्याबद्दलची जबाबदारी, कंपनी सरकारने सांगली आणि सांगलीकर... .२०५