पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तुत लेखकाला नाटेकरांच्या अतारवयातील का होईना, पण त्यांचे चांगले खेळ बघायला मिळाले हे भाग्यच. अर्थात शब्दांनी कितीही वर्णन केलं तरी कुणाच्याही खेळाला 'न्याय' देता येत नाही! दोन्ही डोळ्यानी 'प्रत्यक्ष' बघणं हेच खरं ! ज्या १९५० च्या दशकात नाटेकर क्रीडाक्षेत्रात आले तेव्हा आजच्यासारखी पैशाची प्रलोभने नव्हती. (आजसुद्धा क्रिकेट, टेनिसच्या तुलनेत बॅडमिंटनमध्ये कमीच) निव्वळ खेळण्याची अनिवार हौस हीच गोष्ट नाटेकराना खेळात घेऊन आली. पण बॅडमिंटन काही आयुष्यभर पुरणारी गोष्ट नाही. तशी व्यावसायिकता त्या काळी तर नजरेच्या टप्प्यातसुद्धा नव्हती. म्हणून तर नाटेकरांच्या वडिलानी सूज्ञपणे, त्याना कॉलेजात असताना, वर्षाच्या वर्षाला पास होण्याची सक्ती केली होती. त्या सूज्ञपणामुळे नाटेकर, बॅडमिंटनच्या रणधुमाळीतून बी.ए. झाले. स्टॅनव्हॅक कंपनीत नोकरीला लागले. आता ते हिंदुस्थान पेट्रोलियममधून निवृत्त होऊन निवांतपणे पुण्यात स्थायिक झाले आहेत. हा एक चांगला योगायोगच म्हणायचा. कारण बॅडमिंटन खेळाचा जन्मच मुळी पुण्यात झाला! आज ६६-६७व्या वर्षीसुध्दा गोल्फ खेळताना तास न् तास ते स्वत:ला हरवून बसतात. त्यांची अलीकडेच प्रत्यक्ष भेट घेतल्यावर, प्रस्तुत लेखकाच्या लक्षात आलं, ते हे की बॅडमिंटन 'वजा' करुनहि त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वामध्ये अनेक सुंदर गोष्टींचा मिलाफ आहे. ते अभिजात रसिक आहेत. मराठी वाङ्मयाचे ते जाणकार वाचक आहेत. त्यामुळे साहित्यिक वर्तुळात त्यांची अठ-बस आहे. जागतिक मराठी परिषद मॉरिशसला भरली, तेव्हा नाटेकरांचा हृद्य सत्कार करण्यात आला होता. त्यापेक्षाही अधिक म्हणजे अभिजात शास्त्रोक्त संगीताचे ते मोठे दर्दी आहेत. श्रवणभक्त आहेत. कुमार गंधर्वांशी त्यांची घनिष्ट मैत्री होती. एखाद्या मैफलीला नाटेकर चुकून जरा अशिरा पोचले तर कुमार त्याना हाक मारुन समोर बसवून घेत असत आणि वर अितराना समजावून सांगत की या रसिकाची जागा माझ्याजवळ बसण्याची आहे म्हणून. भीमसेन जोशी, पं. रविशंकर यांच्याशी त्यांची अशीच खास जानपहचान आहे आणि या साऱ्या बुजुर्गांच्या मैत्रीचा नाटेकराना खास अभिमान आहे. एका संगीतकाराने सांगितले की जसं निर्जीव तबल्यातून झकीर जिवंत 'बोल' काढतो, रविशंकरची सतार आपल्याशी 'बोलत' आहे, संवाद साधत आहे असं रसिकाला वाटतं तसंच आम्हा संगीतकारांना नाटेकरांचा खेळ पहाताना, एखादी मैफल ऐकल्याचा भास होतो ! बॅडमिंटनचं निर्जीव फूल जिवंत होऊन मजेत झोके घेतय असं वाटतं! हा संगीताचा 'कान' नाटेकरांना सांगलीतच मिळाला. त्यांच्या बहिणीला, नलूताई देसाईना, सांगलीचे प्रख्यात हार्मोनियम वादक बाळकृष्णबुवा मोहिते शिकवायला येत तेव्हाच अनेक सुरावटी ऐकून त्यांचा कान तयार झाला आणि संगीताची आवड वाढीस लागली ती आजोळच्या डॉ. देसाईंच्या घरामुळे. सांगली आणि सांगलीकर.. .१९९