पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाटेकरांच्या बॅडमिंटनमुळे ही अनोखी 'शट्ल सर्व्हिस' थेट अिंग्लंडमधील केंब्रिजपासून सांगलीपर्यंत सुरु झाली. नाटेकरांचं शालेय जीवन सांगलीत गेलं. सांगली हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. विजय हजारे यांचे गुरु, हणमंतराव भोसले हे तेथे क्रीडाशिक्षक होते. अर्थात त्यामुळे क्रिकेटची मोठी चलती होती. पण नाटेकरांना खेळाचं खरं बाळकडू घरातच मिळालं. त्यांचे आजोबा डॉ. व्ही. एन. देसाई म्हणजे सांगलीतील एक महनीय व्यक्तिमत्व होतं. बॅडमिंटन, टेबल-टेनिस, टेनिस अशा खेळांना त्यानी फार अत्तेजन दिलं. सांगली जिमखाना म्हणजे डॉ. देसाई असं एक समीकरणच होतं, अितकं त्यानी जिमखान्याला वाहून घेतलं होतं. अितकंच काय पण बुद्धिबळासारखा घराघरातून बंदिस्त असणाऱ्या बैठ्या खेळाला सुध्दा त्यानीच व्यासपीठ मिळवून दिलं. त्यांच्यामुळे नंदू आणि त्यांचा मामेभाऊ मधू देसाई याना फार लहानपणापासून सांगली जिमखान्यात सर्व प्रकारचे खेळ खेळायला मिळायचे. त्याकाळी सांगली हायस्कूलची क्रिकेट टीम मोठी नावाजलेली होती. सांगली हायस्कूल आणि सांगली इलेव्हनतर्फे वयाच्या १४- १५ वर्षीच नाटेकर क्रिकेट मॅचेस खेळले आणि त्यात त्यानी आपले नैपुण्य दाखवले. टेनिस, टेबल-टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट असे सर्वच खेळ नाटेकर सारख्याच कुशलतेने खेळत. त्यांचं विलक्षण क्रीडानैपुण्य पाहून वयाची अट त्यांच्या बाबतीत शिथिल करुन त्याना सांगली जिमखान्याचं सदस्यत्व देण्यात आलं. त्यांच्या कौशल्यपूर्ण खेळामुळे डॉ. देसाईनी आपल्या नातवाच्या बाबतीत जिमखाना सदस्यत्व देण्यात पक्षपातीपणा दाखवला असं कुणीच म्हणू शकत नव्हता आणि ही गोष्ट किती सुयोग्य होती है नाटेकरानी ताबडतोब, सांगली जिमखान्याची ज्युनिअर चैंपियनशिप जिंकून सिद्धही केलं. ही घटना अवघ्या १४ व्या वर्षीची (१९४७). त्यांच्या खेळातील पारंगतता बघून घरच्या मंडळींनी ठरविलं की या 'जोनाथन' ला अडण्यासाठी सांगलीचं आकाश फारच ‘लहान' पडतय! याला मुंबईच्या विशाल अवकाशातच पाठवायला हवं. त्यामुळे मॅट्रिक झाल्यावर नंदू नाटेकराना सांगलीतून मुंबईत पाठवण्यात आलं. त्यांचे मामा राजाभाऊ देसाईं यांची बोरीबंदरजवळ जागा होतीच. त्यांचा क्रीडापटू मुलगा आणि नाटेकरांचा मामेभाऊ मधू देसाई शिक्षणासाठी आधीच तिथं गेला होता. दोघांच्या खेळाचा दर्जा बघून हिंदू जिमखान्याचं सदस्यत्व मिळण्यात त्या दोघांना कोणतीच आडकाठी आली नाही. आता नाटेकरांपुढे प्रश्न होता, करीअर करायची तर कोणत्या खेळात करायची ? कारण क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, असे सर्वच खेळ ते अत्तम खेळत. एखादा रंगभूमीवरील नट नाटकातील प्रत्येक भूमिका तितक्याच ताकदीने करणारा असला सांगली आणि सांगलीकर.. ..१९४