पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बॅडमिंटन युग निर्मिणारे नंदू नाटेकर १९५१-५२मधली गोष्ट. मुंबईच्या प्रख्यात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस कोर्टावर मॅच चालली होती. ऑल इंडिया हार्ड कोर्ट टेनिसच्या मॅचेसमधील ती फायनल मॅच होती. दोन्ही तरुण मोठ्या जिद्दीने खेळत होते. अर्थात् कोणीतरी एक जिंकणार आणि एक हरणार. शेवटी एकजण जिंकला. त्याने पुढे टेनिसमध्ये भारताचे नाव गाजवले. त्याचं नाव रामनाथन् कृष्णन. पण गंमत म्हणजे जो तरुण हरला त्याचं नाव तर साऱ्या जगात अधिकच दुमदुमलं. पण टेनिसमध्ये नाही तर बॅडमिंटनमध्ये. त्याचं नाव नंदू नाटेकर ! हे नंदू नाटेकर सांगलीचे सुपुत्र. १२ मे १९३३ रोजी त्यांचा जन्म सांगलीत झाला. नंदकुमार महादेव नाटेकर असं कागदोपत्री नाव असलेले नाटेकर लहानपणापासून ते विश्वविख्यात खेळाडू होईपर्यंत गाजले ते 'नंदू नाटेकर' म्हणून; अगदी कृष्णाकाठच्या सांगलीपासून ते टेम्सतीरी असलेल्या लंडनपर्यंत. सांगली, बॅडमिंटन आणि नंदू नाटेकर यांचं अतूट नातं दर्शविणारी एक बोलकी घटना आहे. सांगलीचे प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. शेखर परांजपे शिक्षणासाठी १९८७-८८ च्या सुमारास अिंग्लंडमध्ये होते. केंब्रिजला शिकत असताना आपली बॅडमिंटन रॅकेट दुरुस्त करायला ते बाहेर पडले. आवडीचा खेळ म्हणून फावल्या वेळात ते बॅडमिंटन खेळत. ज्या स्पोर्टस्च्या दुकानात ते गेले त्याचा मालक एक ब्रिटीश माणूस होता. परांजपे आशियायी देशातील अशा कल्पनेने त्याने सहज 'कुठले?' म्हणून विचारले तेव्हा परांजपे यानी सांगितले की, 'मी सांगलीचा आहे.' सांगलीचे नाव ऐकताच तो ब्रिटीश मालक एकदम आनंदाने म्हणाला "ओह, यू आर फ्रॉम नंदू नाटेकर्स प्लेस!” बॅडमिंटन रॅकेटचे गटिंग करता करता त्याने इंग्लंडमधील, बॅडमिंटन टूर्नामेंट्स मध्ये नाटेकरांचा जो सुरेख खेळ बघितला होता, त्याचं रसभरीत वर्णन ऐकवलेच पण बॅडमिंटन दुरुस्तीची एक पैसुध्दा घेतली नाही! नाटेकरांचा गाववाला. मग पैसे कसले घ्यायचे? अशी त्याची कौतुकाची भावना. सांगली आणि सांगलीकर.. १९३