पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विकेट्स बघत होते. पाचवी विकेट पडल्यावर दुसऱ्या बाजूला त्यांचे धाकटे बंधू विवेक हजारे खेळण्यास आले. वास्तविक ते काही मान्यवर फलंदाज नव्हते. पण त्यानी 'टिकून' रहाण्याचा निश्चयच केला असावा. आपल्या भावाची हिंमत पाहून विजय हजारेना चेव आला. त्यानी दुसरी बाजू 'सुरक्षित' आहे याची खात्री पटल्यावर चौफेर टोलेबाजी सुरु केली. विकेट पडता पडत नव्हती. दोघेहि बंधू नेटाने खेळत होते. एकाने गोलंदाजीवर हल्ला चढवायचा आणि दुसऱ्याने फक्त चेंडू थटवायचा. एक नाही, दोन नाही, तब्बल साडे पाच तास दोन्ही बंधू सयामी जुळ्यांसारखे चिकटून बसले होते! आणि या अवधीत त्यानी ३०० धावांची भागीदारी केली. टेकू देणाऱ्या विवेकचा 'वाटा' केवढा असेल? फक्त २१ धावांचा! पण किती बहुमोल ! त्या केवळ २१ धावा, विजय हजारेंच्या २६६ धावाना भक्कम 'संरक्षण' देऊन गेल्या. रेस्ट संघाची एकूण धावसंख्या झाली ३८७. आणि त्यातील ३०९ धावा एकट्या हजारेंच्या. म्हणजे एकूण धावसंख्येच्या ८० टक्के धावा एकट्याच्या; आणि अरलेल्या ७८ धावा अितर दहाजणांच्या मिळून ! आणखी एक गंमत म्हणजे शेवटचा गडी खेळायला आला तेव्हा हजारेंच्या धावा होत्या २९५. त्रिशतकाला ५ कमी. शेवटचा गडी (रोच) कोणत्याही क्षणी 'गारद' होण्याची शक्यता. एरवी संथ मानल्या जाणाऱ्या हजारेनी त्रिशतक गाठलं ते चक्क षटकार मारुन ! २९५ वरुन ३०१ ! रणजी सामन्यातील आणि अितर प्रथम श्रेणीच्या सामन्यांमधील त्यांचे अनेक डाव असे चित्तथरारक आहेत. कसोटी सामन्यांमधील ७ शतके धरुन प्रथमश्रेणीच्या सामन्यातून त्यांची ५७ शतके आहेत तर ६६ अर्धशतके आहेत. दोन वेळा त्रिशतके आणि ८ वेळा द्विशतके ठोकणारे ते एकमेव भारतीय खेळाडू. गुलमहमद या खेळाडूच्या भागीदारीत त्यानी तब्बल ५७७ धावा कुटून जागतिक विक्रमच केला. नुसत्या ३०० च्या वर भागीदाऱ्या त्यानी ९ वेळा केल्या. एवढं कमी पडलं म्हणून की काय या 'ऑल टाईम ग्रेट' क्रिकेटवीरानं, रणजीमधील २९१ विकेट्स धरुन, एकूण ५०६ विकेट्स प्रथमश्रेणीच्या सामन्यात घेतल्या. एवढा जबदस्त आवाका असलेल्या या वीराला कसोटी क्रिकेटला मात्र अशी प्रचंड आकडेवारी देता आली नाही याची कोणत्याहि क्रिकेटप्रेमीला हळहळ वाटेल. सांगली आणि सांगलीकर.. १८७