पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घेऊन अष्टपैलू कामगिरी केली. भारतीय क्रिकेटचे महर्षी प्रो. दि. ब. देवधर यांजबरोबर त्याना शतकी भागी करायला मिळाले. पुढच्याच वर्षी आणखी एका महान खेळाडूसमवेत खेळण्याचा हजारेना योग आला! ते म्हणजे सी. के. नायडू. देवासच्या महाराजांबरोबर देवासला गेल्यावर, पुढील पाच वर्षे ते त्यावेळच्या मध्य-भारत संघाकडून खेळले. कर्णधार होते कर्नल सी. के. नायडू. सी. के. ना हजारेंचा खेळ अतिशय आवडला. राजपुताना संघाविरुद्धच्या रणजी सामन्यात, बाकी लोकांचा विरोध असतानासुध्दा त्यानी हजारेना चौथ्या क्रमांकावर बढती देऊन पाठवलं. हजारेनी सी.के.चा विश्वास सार्थ ठरवत रणजीमधील आपले पहिले शतक झळकावले. रणजीमधील पुढील २२ शतकांची ही पायाभरणी होती! या शतकाने हजारे खऱ्या अर्थाने फलंदाज म्हणून प्रकाशझोतात आले. अतके की क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव डिमेलो यानी इंग्लडला जाणाऱ्या भारतीय संघासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली. मात्र एका सभासदाने विरोध करताना म्हटले की हजारे अद्याप चौरंगी सामन्यात खेळलेले नाहीत! वस्तुस्थिती अशी होती की चौरंगी सामने जातीय तत्वावर खेळले जात. हिंदु, मुसलमान, पार्शी आणि युरोपिअन अशी धर्माप्रमाणे वर्गवारी होती. 'न हिंदु, न यवन' अशी हजारेंची अवस्था. भारतीय ख्रिश्चन असल्याने युरोपिअन टीममध्येहि त्यांचा अंतर्भाव होत नव्हता ! या 'त्रिशंकू' अवस्थेमुळे इंग्लडला जाणाऱ्या भारतीय संघात हजारेंचा समावेश होऊ शकला नाही, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होती. इंग्लंडमध्ये खेळल्याशिवाय कोणताहि खेळाडू परिपक्व होत नाही. तेथील ओलसर हिरव्या खेळपट्टीवर खेळण्याचा हजारेना अनुभव मिळाला असता तर संघाला त्याचा फायदा झाला असता. १९३६ साली त्यांचे वय २१ वर्षाचे होते म्हणजे क्रिकेटच्या दृष्टीने ऐन तारुण्यात असताना त्याना कसोटी सामने खेळायला मिळाले असते, पण... पहिली कसोटी खेळण्यासाठी, आणखी तब्बल १० वर्षे त्याना वाट पहावी लागली. म्हणजे तिशी अलटेपर्यंत ! कारण मधली वर्षे दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत गेली. विजय हजारे यांची २१ ते ३१ अशी ऐन अमेदीची वर्षे जरी कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने वाया गेली तरी रणजी सामने आणि नंतर सुरु झालेले पंचरंगी सामने यामध्ये त्यांची क्रिकेट प्रतिभा पूर्णपणे बहरुन आली. सुरुवातीला म्हणजे १९३९-४० च्या मोसमात ते महाराष्ट्राकडून खेळले आणि १५४ च्या विलक्षण सरासरीने ६१९ धावा काढून, महाराष्ट्राला त्यानी पहिल्यांदाच प्रतिष्ठेचा रणजी करंडक मिळवून दिला. पुढील वर्षी त्याचीच पुनरावृत्ती सांगली आणि सांगलीकर.. १८५