पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कथाकार श्री. दा. पानवलकर


 ‘हंस' व ‘मोहिनी' मासिकांचे संपादक श्री. आनंद अंतरकर यानी केलेले एका व्यक्तीचे वर्णन पहा.
 “सावळा ग्रॅनाईट वर्ण. सहा फुटांच्या आसपास अंची भव्य भालप्रदेश. कृष्णाकाठची कमावलेली कणखर शरीरयष्टी. तांबूस पिवळी झाक असलेले डोळे. पिंगट पारदर्शी बाहुल्या, खोलवर ठाव घेणारी भेदक नजर. गरूडतीक्ष्ण धार त्या नजरेत अतरलेली 'आठा'च्या आकड्यासारखं नाक. त्याखाली गालांत टोकं रुतणारी तलवार कट् मिशी. इंग्रजी 'डब्ल्यू' सारखी खड्डा पडलेली हनुवटी. ही दुबेळकी हनुवटीही पहाणाऱ्याकडे टवकारून बघायची. जरबेच्या भाषेत बोलायची. चेहेऱ्यांच्या स्नायूंवर, जीवनानंद दिलेल्या कष्टदानाच्या जागोजागी दृढ गाठी बांधलेल्या. हसणंही मेटॅलिक. नजर बांधून टाकणारं बेछूट, मर्दानी व्यक्तिमत्व."
 या वर्णनावरून हे एखाद्या लेखकाचं, त्यातही, सांगलीकडील लेखकाचं वर्णन असेल, असं वाटतं तरी का? पण तो खरोखरीच एक लेखक होता; तो सुध्दा सांगलीचा.
 त्याचं नाव श्री. दा. पानवलकर.
 १९६० ते १९८५ या पाव शतकातले एक जबरदस्त सामर्थ्याचे कथाकार म्हणून, ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं ते पानवलकर.
 सांगलीसारख्या गावात, आणि मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला हा माणूस, वृत्तीने एवढा कलंदर, बेछूट आणि बेदरकार होता की अर्नेस्ट हेमिंग्वेसारख्या एखाद्या पाश्चात्य लेखकाचीच आठवण व्हावी!

 पण ही वृत्ती कदाचित् त्यांच्या नोकरीच्या स्वरुपावरून आलेली असावी. पानवलकर कस्टम ऑफिसर होते. काळे धंदे करणाऱ्या स्मगलर्सना, वेळप्रसंगी कंबरड्यात लाथ घालून, ड्युटी चुकवून लपवलेला माल ओकावयाला लावणारे, ते एक करडे कस्टम ऑफिसर होते. एक लेखक म्हणून त्यांचे कथावाङ्मयसुद्धा एखाद्या अस्सल कस्टम ऑफिसरसारखेच होते. मानवी जीवनात, मानवी वर्तनात जे


सांगली आणि सांगलीकर.................................................................................. १७३