पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोट ठेवून, जैन समाजाचे, जैन संस्कृतीचे दर्शन घडविणारे साहित्य निर्माण करण्याचे आवाहन त्यावेळी राजमतीबाईंनी आपल्या भाषणातून केले होते.
 वयाची ७५ वी अलटल्यावर मात्र राजमतीबाईंची प्रकृती साथ देईनाशी झाली. रक्तदाब, गुडघेदुखी या व्याधी त्याना त्रास देऊ लागल्या. त्यातच राजमतीबाईंचे धार्मिक आचरण अत्यंत कडक. अंगात ताप असताना सुध्दा त्यांचे अपास-तापास चालूच असत. या बाबतीत आपल्या जवळच्या नातेवाईकांचेच काय पण डॉक्टर मंडळींचेहि त्या ऐकत नाहीत. या अति कष्टांमुळेच कदाचित त्याना ऑक्टोबर ८९ मध्ये ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस अपचार घ्यावे लागले. अखेरीस पेस मेकर बसविल्यावर त्यांच्या प्रकृतीस थोडा आराम पडला. पण त्यानंतर त्यांच्या नैमित्तिक कार्यात मात्र खंड पडला. आपल्या कामाचे बहुतेक सर्व व्याप त्यानी आता कमी केले आहेत.
 राजमतीबाईंचा एकच एक गुणविशेष सांगा असा कोणी प्रश्न केला तर त्याचे एकमेव अत्तर म्हणजे त्यांच्या मनाचा कनवाळूपणा. मिरज मिशनमध्ये स्वतः दुखण्याने जर्जर झालेल्या असतानासुध्दा एका गरीब रुग्णाची पीडा पाहून त्यांचा जीव कळवळला. त्याला पेस-मेकर बसवण्यासाठी १६,००० रुपयांची आवश्यकता आहे तरच त्याचा प्राण वाचेल हे कळल्यावर, स्वतःच्या शुश्रूषेला असलेल्या माणसाला, ताबडतोबीने सांगलीला पाठवून त्यानी त्या अनोळखी तरुणासाठी पैशाची व्यवस्था केली.
 बघा म्हणजे तो तरुण अनोळखी पण त्याची पीडा मात्र बाईंच्या कनवाळू मनाला 'ओळखीची' वाटली!
 याच करुणेपोटी जैन समाजामधील तीस-पस्तीस गरीब बंधू-भगिनींना त्यानी स्वत:च्या खर्चाने श्री सम्मेतशिखरजीची यात्रा घडवून आणली. या दानशूरतेमुळेच श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ येथील पूज्य श्रीचारुकीर्ती महाराजानी, त्याना 'दान चिंतामणी' ही श्रेष्ठ पदवी आणि मानपत्र दिले.
 त्यांच्या या दातृत्वाचा आणि एकूणच सामाजिक कार्याचा गौरव म्हणून सुप्रसिध्द वक्ते आणि लेखक श्री. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते १९९८ मध्ये जाहीर सभेत त्याना मानपत्र अर्पण करण्यात आले आणि त्याना 'सांगली - भूषण' हा किताब देण्यात आला.

(नुकतेच ३१ डिसेंबर २००१ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. )
●●●

सांगली आणि सांगलीकर...............................................................१७२