पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरुवात केली. अगदी अल्पावधीतच एक विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. खरं म्हणजे त्या महिलाश्रमातच त्यांची कारकीर्द घडावयाची.
 पण तसा योग नव्हता. सांगलीच्या राणीसाहेब, सरस्वतीदेवी स्त्री-शिक्षणाच्या मोठ्या पुरस्कर्त्या होत्या. सांगलीत स्थापन झालेल्या मुलींच्या दोन शाळा आणि महिला विद्यालय याकडे त्या जातीने लक्ष देत. राजमतीबाईंच्या अध्यापन कौशल्याची कीर्ती त्यांच्या कानावर जाताच, त्यानी राजमतीबाईना आमच्या शाळेत काम करा अशी गळ घातली. घरातील सर्वांनी चर्चा केली. संस्थानी शाळेचा आणि मुलींची शाळा नं १ ही नावाजलेली शाळा, हुशार विद्यार्थिनींची शाळा, तिथे काम करण्यातील आव्हान या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यावा आणि फावल्या वेळात त्या अनुभवाचा फायदा जैन महिलाश्रमास करुन द्यावा असा सर्वांचा निर्णय झाला. त्यानुसार राजमतीबाई १९३८ साली या मुलींच्या सरकारी शाळेत रुजू झाल्या आणि तिथं अितक्या रुळल्या की अखेरीस त्या शाळेतूनच मुख्याध्यापिका म्हणून राजमतीबाई निवृत्त झाल्या. या दीर्घ काळात त्यानी अक्षरशः तन मन आणि प्रसंगी धन वेचून त्या शाळेचे एखाद्या खाजगी आदर्श शाळेप्रमाणे संचालन केले. योगायोगाने त्यांची बालमैत्रिण सौ. इंदुमती टिळक या त्याना त्याच शाळेत सहाध्यायी म्हणून मिळाल्या. दोघीनी अपार कष्ट घेऊन, एकतानतेने काम करुन ही शाळा चांगलीच नावारुपाला आणली. शाळेचे परीक्षांचे निकाल अत्तम लागतच; पण वक्तृत्व, चित्रकला, संगीत, नाट्य अशा सर्व सांस्कृतिक बाबतीत ही शाळा सांगलीत अग्रेसर राहिली. राजमतीबाईंची या शाळेच्या एकूण कामकाजावर एवढी जबरदस्त छाप पडली होती की मुलींची शाळा नं १ म्हणण्याऐवजी 'राजमतीबाईंची शाळा' असाच अल्लेख सर्वाच्या तोंडी येऊ लागला !

 सेवानिवृत्तीनंतर त्यानी पुन्हा जैन महिलाश्रमाच्या कामाला सुरुवात केली. आठ वर्षे त्यानी सेक्रेटरी म्हणून काम केले. हिंदमाता कन्झ्युमर्स सोसायटी या सरकारमान्य महिला धान्य (सहकारी) दुकानाच्या सतरा वर्षे त्या ऑनररी सेक्रेटरी होत्या. आश्रमात त्यानी महिलांचे भजनी मंडळ, धार्मिक परिक्षांचे वर्ग, महिलांसाठी पोथी वाचन असे अनेक उपक्रम राबवले. बाल मंदिरापासून महाविद्यालयापर्यंत महिलांसाठी शाळा-कॉलेज विशिष्ट परंपरेने चालवणाऱ्या वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीवर त्यानी आठ वर्षे काम केले. दक्षिण भारत जैन सभेच्या महिला विभागाशी त्यांचा निकटचा संबंध होता. दक्षिण भारत जैन महिला समाजाच्या बेळगाव अधिवेशनाच्या वेळी त्या स्वागताध्यक्षा होत्या तर रुकडीच्या अधिवेशनाच्या वेळी त्यानी अध्यक्षपदाची सूत्रे समर्थपणे सांभाळली होती.


सांगली आणि सांगलीकर.............................................................................. १६९