पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनाने घेतलं. त्यांचा हट्ट म्हणून त्याना जैनापूरच्या मुलांच्या शाळेत घालण्यात आले. त्यांची शिक्षणातील एकूण प्रगती बघून शाळेतील शिक्षक मंडळीनी त्याना आणखी शिकवा अशी शिफारस केली.
 पण घरच्या लोकांसमोर यक्षप्रश्न होता. तो असा की मुलांच्या शाळेत मुलीला जास्ती दिवस कसे ठेवायचे?
 छोट्या राजमतीच्या सुदैवाने म्हणा वा शिक्षण घेण्याची तिची तीव्र अिच्छाशक्ती म्हणून म्हणा पण तिची अिच्छा फलद्रूप झाली.
 त्यांचे मामा श्री. बाबगौंडा पाटील यानी त्यावेळी सांगलीत नुकतीच वकिली चालू केली होती. त्यानी राजमतीची शिक्षणाची अिच्छा बघून तिला सांगलीला आपल्या घरी आणलं. त्यावेळच्या सांगलीच्या वखारभागात श्रीमती कळंत्रेबाई यांनी नुकताच जैन महिलाश्रम सुरू केला होता. त्या आश्रमात राजमतीबाईंचे शिक्षण पुढे चालू झाले.
 या मामांच्या घरी शिक्षणाचाच योग नव्हता तर विवाहयोगही होता!
 पाटील वकिलांचे धाकटे बंधू श्री. नेमगोंडदादा यांच्याबरोबर राजमतीबाईंचा विवाह झाला. राज-नेमीचा संसार सुरू झाला.
 १९३१च्या एप्रिलमध्ये राजमतीबाई सातारा केंद्रातून व्हर्न्याक्लुर फायनल परीक्षेत पहिल्या क्रमांकाने अत्तीर्ण झाल्या. त्यावेळी सांगली-मिरजेच्या मुलींना या परिक्षेसाठी सातारा येथे जावे लागे.
 जैन समाजात शिकणाऱ्या मुलींची संख्या कमी आणि त्यात एक मुलगी चक्क पहिली येते ही गोष्ट मोठी नवलाईची होती. त्यामुळे पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये जाऊन राजमतीने पुढील शिक्षण घ्यावे असे जैन समाजातील धुरिणाना वाटत होते. पण लग्न होऊन पुरा एक महिनापण झाला नव्हता, अशावेळी राजमतीबाईंच्या यजमानानी म्हणजे नेमगोंडदादांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यामुळेच राजमतीबाई पुण्याच्या गव्हर्मेट ट्रेनिंग कॉलेज फॉर लेडीजमध्ये रीतसर प्रवेश घेऊ शकल्या. मिस् वाडिया या कडक शिस्तीच्या पार्शी महिला त्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉल होत्या. प्रशासन कसं हाताळावं याचा जणू वस्तुपाठच राजमतीबाईंना तेथे मिळाला. त्या कॉलेजच्या वातावरणात त्यांची अपजत पण सुप्त असलेली हस्तकलापण बहरून आली. बौद्धिक विषयांचा त्यानी झटून अभ्यास केला. परिणामी तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेत त्यांचा पहिला नंबर आला.

 सांगलीला परत आल्यावर काही काळ त्यानी जैन महिलाश्रमात अध्यापनास


सांगली आणि सांगलीकर........................................................................... ...१६८