पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दान चिंतामणी राजमतीबाई पाटील



 सुमारे ७०-८० वर्षांपूर्वीच्या काळात एकूण शिक्षणाचाच प्रसार कमी होता. आज शिक्षणसंस्था अदंड झाल्या आहेत. सर्व थरातील मुलींना विनासायास, अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण विनामूल्य मिळत आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळातील समाजमनाची नीटशी कल्पना आपल्याला येत नाही. मुलींनी शाळेत जाऊन मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेणे ही कल्पनाच त्याकाळी क्रांतिकारक वाटंत होती! अशा काळात जैन समाजातील एखाद्या स्त्रीने शाळेत जावे; शिकून आपल्या समाजातील स्त्रियांना ' शिकवण्यासाठी स्वत:ला वाहून घ्यावे, इतकेच काय, आपली सारी संपत्ती धार्मिक आणि शैक्षणिक कार्यासाठी दान करावी ही विलक्षणच गोष्ट म्हणावी लागेल.
 अशी लोकविलक्षण स्त्री म्हणजे १९९८साली ज्या महिलेचा 'सांगली - भूषण' म्हणून जाहीरपणे गौरव करण्यात आला त्या 'दान - चिंतामणी' श्रीमती राजमतीबाई पाटील.
 आज सांगलीच्या नेमिनाथनगरमध्ये कुणी सहज फेरफटका मारला आणि तेथील नेमिनाथमंदिर, राजमतीभवन आणि राजमती कॉम्प्लेक्स या अत्तुंग, वास्तुशास्त्रदृष्ट्या अत्यंत देखण्या इमारती बघितल्या, तिथे चालणारे कार्य बघितले की या राजमतीबाईंच्या कार्यकर्तृत्वाची कल्पना येईल. पाच-पन्नास लाखांच्या या भव्य वास्तू जैन समाजातील एका महिलेने बांधवून घेतल्या आहेत या वस्तुस्थितीवर कोणाचा सहजासहजी विश्वासच बसणार नाही. सांगली मोठी करण्यासाठी अनेकानी अनेक कामे अभी केली आहेत; अनेक प्रसंगी त्यासाठी शासन वा समाजाकडून पैसा अभा केला गेला असेल पण राजमतीबाईंनी मात्र जे काही वैभव अभे केले ते मात्र स्वतःच्या पैशातून. म्हणून त्याचे आगळे कौतुक आहे.

 अशा या राजमतीबाईंचा जन्म, १७ मे १९१४ रोजी सांगलीजवळील समडोळी या गावी झाला. त्यांचे बालपण त्यांच्या जनकगृही म्हणजे जैनापूर येथेच गेले. पंचवीस-तीस जणांच्या एकत्र कुटुंबात त्या वाढल्या. केरवारा, धुणी, जनावरांना चारा वैरण, पूजेची तयारी अशा नैमित्तिक कामात त्या तरबेज झाल्या. त्यांच्या मावशीचे यजमान जैन समाजातील सुधारक आणि स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मुली शाळेला जात. ते पाहून आपणही शाळेत जावं असे छोट्या राजमतीच्या


सांगली आणि सांगलीकर......................................................................... १६७