पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्यानंतर 'हंस' पिक्चर्सच्या मा. विनायकानी बोलावणे पाठवले. खुद्द बालगंधर्वानी आपल्याकडे बोलावले, "स्त्री भूमिका आणि पुरूषभूमिका तुमच्यासारख्या, सारख्याच ताकदीनं मलासुध्दा करता येणार नाहीत' अशी खुद्द बालगंधर्वानीच पूर्वी अविनाशांची भलावण केली होती.
 तरीसुध्दा अविनाश गेले नाहीत.
 नैतिक जबाबदारीचं ओझे हे मनाने मानले तरच असते. एरवी कुठेहि जायला अविनाश मुक्त होते. पण ते गेले नाहीत. बलवंत' ची हरणारी लढाई ते एकहाती लढत राहिले.
 म्हणून तर दीनानाथानी शेवटचा श्वास घेताना हाक मारली ती आपल्या जिवाभावाच्या 'गणू'लाच!
 पुढे 'अत्रे पिक्चर्स' साठी आचार्य अत्रेनी अविनाशबरोबर दहा पिक्चर्स करण्याचा 'तोंडी' करार केला. त्यांचा 'पायाची दासी' त्यावेळी तुफान चाललेला होता. 'प्रकाश' पिक्चर्सचे सुप्रसिध्द निर्माते-दिग्दर्शक श्री. विजय भट्ट, अविनाशकडे, 'भरतभेट' चित्रपटासाठी ऑफर घेऊन आले. १४००/- रु.द.म. अशा त्या काळात घसघशीत वाटणारा पगार त्यानी देऊ केला होता. अत्रे सोडायला राजी नव्हतेच; पण त्याना ‘तोंडी' का होईना, आपण 'वचन' दिलय, तेव्हा त्यांचे दहा पिक्चर्स झाल्याशिवाय जायचं कसं? अशा धर्मसंकटात अविनाश पडले होते!
 आजच्या काळात ‘अिमानदारी' ही सप्तपाताळात गाडली गेलेली चीज आहे. तेव्हा अविनाशांच्या 'अमान-धर्माची' आपण कल्पनाच करू शकत नाही.
 यासंदर्भात ‘फुलवंती’ ही अलिकडे दूरदर्शनवर गाजलेली मालिका जाणकारांच्या लक्षात येईल. त्यातील एका प्रसंगात, फुलवंती, वचनभंग करण्याच्या मन:स्थितीत असते, तेव्हा तिचा सारंगिया कळवळून म्हणतो “बेटी, कलाकारकी जुबान ही असकी जान होती है।"
 छोट्याशा भूमिकेतील हा सारंगिया रसिकांच्या स्मरणात राहिला. कारण तो साकार केला होता मा. अविनाशनी! तो सुध्दा वयाच्या ८४ व्या वर्षी निवृत्ती पत्करलेली असतानाहि त्याना हे काम करावचं लागलं. कारण ते 'घरचं काम होतं ना ? मंगेशकर मंडळींची ती मालिका होती. आलोकनाथ, ए. के. हनगल अशा मंडळींची 'टेस्ट' झाली होती; पण अषा मंगेशकरांना जो 'सारंगिया' अभिप्रेत होता, तो त्यांच्यामध्ये मिळेना, म्हणून मग 'घरच्या' गणूमामाना आपल्या भाचीचा हट्ट पुरवावा लागला !

 नव्वदीतून शंभरीकडे ताठ कण्याने वाटचाल करत असलेल्या मा. अविनाशना आणखी एका सांगलीकर अविनाशची ही वाङ्मयीन वंदना !

●●●


सांगली आणि सांगलीकर........................................................................ १६६