पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. सुरूवातीला जरी त्याना, भास्करबुवा बखले, वझेबुवा यांची तालीम मिळाली, तरी त्यानी अनन्यभावाने दीनानाथांचे शिष्यत्व पत्करले होते. दीनानाथांची गायकी अप्रतिम होती. तालासुराला पक्की होती. त्यांच्या गाण्यात शोधकदृष्टी, नाविन्य आणि वैचित्र्य होते. गाताना ते नेहमी नवेनवे प्रयोग करीत. 'मानापमान' नाटकातील एका पदाची चाल, त्यानी आठ मात्रांऐवजी सात मात्रांवर घेऊन, त्या पदाचा स्वरविलास वाढविला होता आणि त्यापायी मा. कृष्णाची बोलणी खाल्ली होती. अशा या दीनानाथांचा फार मोठा प्रभाव, अविनाशवर होता. दीनानाथांच्या पुढ्यात बसून अनेक चिजा, नाट्यपदे अविनाशनी आत्मसात केली. लता, आशा ही लहान पोरं त्यावेळी जिवाचा कान करुन ऐकत बसत. दीनानाथांच्या सततच्या सहवासाने गुरू- शिष्याचे नाते, भावाचे बनले. दीनानाथ त्याना धाकटा भाऊ मानत. माई मंगेशकर पण भाऊ मानत. लता, आशा, अषा, मीना, आणि बाळ ( हृदयनाथ) ही भावंडे, त्याना गणूमामा म्हणत. (अजून म्हणतात.) १९१७ ते १९४२ या प्रदीर्घ काळात त्याना दीनानाथांचा सहवास लाभला. नोकर, सहकारी, शिष्य, कुटुंबीय अशा चढत्या श्रेणीने त्यांचे भावसंबंध गहिरे होत गेले. त्यामुळे 'बलवंत' ची स्थिती डबघाईला आली. दीनानाथांचं व्यसन बेसुमार वाढलं, तेव्हा मंगेशकर कुटुंबाला 'गणूमामा' हा मोठाच 'आधारवड' लाभला. नाटकं करायची, 'बलवंत' चा 'ताल' सांभाळायचा, दीनानाथांशी गोड बोलून त्याना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत, त्यांचा 'तोल' सांभाळायचा अशी अविनाशांची कसरत चालली होती आणि 'बलवंत' चे चालकत्व, त्यांच्याकडं आल्यापासून तर अविनाशांची जबाबदारी फारच वाढली. पंखातील बळ गेलेल्या गरूडाप्रमाणे, दीनानाथ हताश झाले. एकेकजण सोडून चालला, तेव्हा तर अविनाश, मंगेशकर कुटुंबियाना घट्ट चिकटून राहिले. जमेल ती मदत करीत राहिले.
 आणि त्याचवेळी त्यांची 'सत्त्वपरीक्षा' चालू होती.
 'बलवंत' मधील भूमिकांमुळे अविनाश कीर्तिशिखरावर होते. त्यामुळे 'प्रभात' या हिंदुस्थानात अग्रगण्य ठरलेल्या फिल्म कंपनीच्या खुद्द शांतारामबापूनी अविनाशना 'अमर ज्योती' चित्रपटासाठी शांता आपटे, या त्याकाळच्या टॉप हिराईनबरोबर, काम करण्यासाठी पाचारण केले. चंद्रमोहनसारखा नट, अविनाश, 'प्रभात' मधील ऑफर घ्यायला राजी होत नाहीत, म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी स्वत: सांगलीला आले.सांगलीच्या माई घाटावर बसून दोघांच्या गप्पा झाल्या. अविनाशांचे मन वळवण्याचा त्यानी खूप प्रयत्न केला, पण अविनाश अचल राहिले.

 दीनानाथना सोडून जाणं शक्यच नव्हतं.


सांगली आणि सांगलीकर................................................................. . १६५