पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रदीर्घ सेवेबद्दल १९९५ साली दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे 'मा. दीनानाथ मंगेशकर पारितोषिक रु. ५०,०००/- चे मिळाले. त्यावर तर त्यांचा सर्वार्थाने हक्कच होता. युनेस्कोप्रणीत प्रथम पुरस्कार मिळाला.
 तथापि, आज जो पुरस्कारांचा महापूर लोटला आहे आणि फारसं 'कॉट्रिब्यूशन' (किंबहुना नगण्य) नसणारी मंडळी, छातीवर पुरस्कारांची अनेक मानचिन्हे लावून मिरवतात, तेव्हा अविनाशाना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या ६० वर्षाच्या प्रचंड नाट्य- चित्रसेवेच्या तुलनेत किती तोकडे आहेत याची प्रकर्षाने जाणीव होते!
 नाट्यसृष्टीचा इतिहास लिहिणाऱ्याला, मोठमोठ्या दिग्गजांच्या रांगेत, अविनाशांसाठी, एक गौरवाचे पान निश्चितच राखून ठेवावे लागेल. आणि त्यांचा सहजसुंदर अभिनय, स्पष्ट शब्दोच्चार, गोड, मोहक रुपडं, स्वच्छ, निकोप गाणं, याविषयी त्यात भरभरून लिहावं लागेल. सव्यसाची अभिनेता म्हणून त्यांची योग्यता फार मोठी आहे. त्यानी बालभूमिका सुरेख केल्या. स्त्रीभूमिका तर हातखंडा होता. नाट्यनिकेतनच्या कालखंडात, नव्या मनूच्या सामाजिक पुरूषभूमिका केल्या. 'राणीचा बाग' मध्ये मनोहरच्या भूमिकेत एक खलनायक, अनेकांच्या कौतुकाच्या शब्दात, म्हणजे 'स्वीट व्हिलन' अभा केला. कहर म्हणजे गरजेच्या प्रसंगी 'भावबंधन' मध्ये 'कामण्णा' ची विनोदी भूमिका केली. पडद्यावरच्या वा रंगभूमीवरच्या भूमिकांबरोबरच, प्रत्यक्ष जीवनाच्या रंगभूमीवर कधी शिकाऱ्याची भूमिका केली, कधी क्रिकेटरची. सांगलीच्या विजय हजारेंबरोबर बालपणी ते क्रिकेट खेळलेच पण तरूणपणी मोठमोठ्या मॅचेसमध्ये पण ते खेळले. त्यामुळेच कर्नल सी. के. नायडूंबरोबर त्यांची घनिष्ट मैत्री जुळली. त्यांच्या प्रेमाखातर ते नेहमी अविनाशच्या नाटकाना आवर्जून येऊन बसत. गंमत म्हणजे शेतीची आवड असणाऱ्या अविनाशनी, पुण्याजवळील तळेगाव-दाभाडे येथे पांचशे एकर जमिनीवर, स्वतःच्या अध्यक्षतेखाली 'अशोक सहकारी सामुदायिक शेतकी संघ' स्थापन करुन शेतीची हौस पण भागवून घेतली!
 अशा अनेक भूमिकांच्या गदारोळात, त्यांच्या 'अिमानदारी' च्या भूमिकेकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही. कुलवान स्त्री जसं आपलं शील जपते त्याच प्रखरतेने आणि निष्ठेने, मा. अविनाशनी आपलं अिमान जपलं. या संदर्भात दीनानाथ आणि एकूण मंगेशकर कुटुंबीय याजंबरोबर त्यांचा आलेला संबंध थोडा स्पष्ट करायला हवा.

 मा. अविनाश 'बलवंत' मध्ये आले ते नोकर म्हणून. दीनानाथांचा त्यांचा पहिला संबंध नोकर-मालक असा आला. त्यांच्या भूमिका गाजू लागल्या, दीनानाथांबरोबर अभे राहून त्यांच्या नायिकांच्या भूमिका समरसून करायला लागल्यावर, दोघांचे नाते समानधर्मियांचे बनले. दीनानाथांच्या विलक्षण गायकीमुळे अविनाश भारून गेले


सांगली आणि सांगलीकर...................................................................... १६४