पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक प्रकारची स्वेच्छानिवृत्तीच. कारण निवृत्त होतानासुध्दा त्यांची लोकप्रियता अखंड होती. कामे मिळण्याचा प्रश्नच नव्हता.
 कदाचित् हाडाचे क्रिकेटर असल्यामुळेच, विजय मर्चंटप्रमाणे त्यानी रिटायर होण्यात अचूक ‘टायमिंग' साधलं, असंच म्हणायला हवं!
 पण थोडा विचार केला तर मा. अविनाशासारख्या रंगभूमीशी अव्यभिचारी निष्ठा असणाऱ्या, श्रध्दावान नटानं निवृत्त होणं, अपरिहार्यच होतं. ते निवृत्त झाले त्यावेळी घरंदाज गायकीचा लोप होत चालला होता. 'हिट अँड हॉट' नाटकांचा जमाना आला. डिस्को आला. ठेकेदारी पध्दत आली. नाईट्स कितीहि 'अर्थ'पूर्ण असल्या, तरी ज्या माणसाला नाटककंपनीत, एखाद्या घरंदाज कुटुंबियासारखी राहण्याची सवय होती त्याला असल्या' नाईट्स' क्षोभकारक वाटत होत्या. अविनाशना 'बलवंत'मध्ये राहून फार मोठे जग बघायला मिळाले होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा मुलगा दिवाकर, अविनाशांचा समवयस्क होता. त्यामुळे त्यांचा अविनाशांवर लोभ होता. गडकरी आजारी असताना ५-६ महिने 'बलवंत' च्या बिऱ्हाडी होते. अविनाशना त्यांचा भरपूर सहवास मिळाला. त्यांच्या विलक्षण भाषाप्रभुत्वाची जवळून ओळख झाली. त्यांच्यावरील लोभामुळे, गडकऱ्यानी 'पुण्यप्रभाव' मधील अविनाशांची भूमिका थोडी वाढवून दिली होती. सावरकरांचे प्रेम त्याना मिळाले होते. वीर वामनराव जोशींबरोबर गप्पागोष्टी करायला मिळाल्या होत्या. खुद्द चिंतामणराव कोल्हटकरानी त्याना गद्य भूमिकांची तालीम दिली होती. अभिनयातील बारकावे समजावून सांगितले होते, वझेबुवांची संगीताची तालीम मिळाली होती. आणि दीनानाथ ? तो तर त्यांच्या आयुष्यातील फार मोठा अध्याय होता. त्यांच्याशिवाय अविनाशांचं जीवन तृणवत् होतं.
 असं फार मोठं वैभव बघितलेल्या अविनाशना, रंगभूमीचं पावित्र्यच नष्ट व्हायला लागलं, असं त्यांच्या मतानं वाटायला लागलं, तेव्हा मोठ्या कष्टी मनानं दूर होणंच अपरिहार्य ठरलं असेल. त्यानीच आपल्या रंगभूमीवरील निवृत्तीच्या संदर्भात एके ठिकाणी मोठ्या मार्मिकपणे म्हटलयं की, “हिमालयाची एकेक अत्तुंग शिखरं मी आयुष्यात बघितली,आता लहान-सहान टेकड्या नाही मला खुणावू शकत.”

 त्यांच्या नाट्यसेवेबद्दल काही पुरस्कार त्याना मिळाले. मराठी संगीत नाटक शताब्दि महोत्सव समिती (मुंबई) आणि मुख्यमंत्री श्री. अंतुले याजकडून १९८४ मध्ये त्यांचा सत्कार झाला. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे, माधवराव शिंदे, ग्वाल्हेर, 'गंधर्व' सुवर्णपदक त्याना मिळालं. १९९२ सालचा, सांगलीचा प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे सुवर्णपदक पुरस्कार, त्याना गौरवपूर्वक प्रदान करण्यात आला. माहेरचा पुरस्कार म्हणून मा. अविनाशना त्याचं अधिक कौतुक वाटलं. संगीत रंगभूमीच्या


सांगली आणि सांगलीकर...................................................................... . १६३