पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भानुमती (ज्योत्स्नाबाई) - " भाग्यवती मी त्रिभुवनी झाले ।
कुबेर माझा धनी

देवदत्त (अविनाश) "तुझेच सारे वैभव येथे ।
मी, नांवाचा धनी"

 पहिल्याच प्रयोगात, पहिल्याच अंकातील या गाण्याला प्रेक्षकांनी अशी काही कडाडून टाळी दिली, की बस्! आपण नाटक जिंकले, असा आत्मविश्वास रांगणेकर, मा. कृष्णा अशा सर्वानाच आला. त्यानंतर त्या नाटकाची प्रचंड यशस्वी घोडदौडच सुरू झाली. १९४२ ते १९७५ या ३३ वर्षांच्या काळात या नाटकाचे अडीच ते तीन हजार प्रयोग झाले. या सर्व प्रयोगांतून अविनाश - ज्योत्स्ना भोळे ही जोडी अजरामर झाली. या नाटकाच्या लोकप्रियतेचे अनेक किस्से चवीने सांगितले जात असत. ज्योत्स्ना भोळेंच्या भानुमतीमुळे हे नाटक जितकं गाजलं तितकंच ते अविनाशांच्या देवदत्तमुळे गाजलं. 'कुलवधू' म्हणजे मा. अविनाश असं समीकरणच त्यामुळे रूढ झाले.
 अलीकडे नव्या पिढीच्या रसिकाना पण या समीकरणाचा प्रत्यय आला. १९४२ साली या नाटकाचा रंगभूमीवर प्रथम प्रयोग झाला या घटनेला ५० वर्षे झाली म्हणून १९९२ साली या नाटकाचा पुण्यात, जुन्या संचात पुन्हा प्रयोग झाला. ज्योत्स्ना भोळे आणि मा. अविनाश या जुन्या जोडीने पुन्हा एकदा तोंडाला रंग फासला. त्यावेळी ८३ व्या वर्षाच्या अविनाशनी स्टेजवर एन्ट्री घेताच प्रेक्षकानी कडाडून टाळ्या दिल्या.
 त्या लोकप्रियतेची ही लोकविलक्षण पावती !
 कुलवधूच्या यशानंतर, अविनाशनी, 'माझे घर' (सरस्वतीबाई राणे) 'राणीचा बाग' (नायिका-स्नेहप्रभा प्रधान) 'तुझं माझं जमेना' (नायिका - ज्योत्स्ना भोळे) अशा अनेक नाटकांतून भूमिका केल्या. रांगणेकरांच्या 'आशिर्वाद' नाटकाच्या २०० प्रयोगात त्यानी कामे केली. नाट्यनिकेतनच्या 'अपूर्व बंगाल,' 'कन्यादान,' अशा बहुतेक सर्वच नाटकांतून त्यानी नायकाची भूमिका केली. त्यापैकी 'तुझं नि माझं जमेना' हे नाटक अविनाश - ज्योत्स्ना भोळे यांच्या द्वंद्वगीतामुळे खूप गाजले होते. त्या दोघांच्या भूमिका असलेला, मो. ग. रांगणेकरांचा, 'कुबेर' हा चित्रपटसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण होता. त्या चित्रपटाचा नायक हा १९४२ च्या लढ्यातील सुप्रसिध्द क्रांतिकारक अच्युतराव पटवर्धन यांजवरून बेतलेला होता.

 'नाट्यनिकेतन' मध्ये ३३ वर्षे राहून रंगभूमीची भरपूर सेवा करून १९७५ साली मा. अविनाशनी, रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातून निवृत्ती पत्करली.


सांगली आणि सांगलीकर............................................................... १६२