पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९१८ ते १९४१ या ‘बलवंत' मधील, जवळजवळ २२-२३ वर्षाच्या कालखंडापेक्षाह हा कालखंड मोठा होता.
 अशाप्रकारे पुन्हा ते आपल्या आवडत्या रंगभूमीकडे वळले. मात्र आता रंगभूमीवर बराच बदल घडून आला होता. 'बलवंत' मधील किर्लोस्करी नाट्यपरंपरा मागे पडून, २।।-३ तासांची, माफक संगीत असलेली नवी चटपटीत नाटके रंगभूमीवर येऊ लागली होती.
 मा.अविनाशांचं कौतुकास्पद वैशिष्ट्य असं की या नव्या रंगभूमीवरसुध्दा ते चपखलपणे वावरले. शास्त्रोक्त संगीताऐवजी सुगम संगीताच्या अंगाने जाणाऱ्या नव्या नाट्यसंगीतातहि ते अगदी सहजपणे चांगले रुळले आणि गाजले.

 'कुलवधू' हे त्यांच्या आयुष्यातील वैशिष्ट्यपूर्ण मानाचे शिखर ठरले. मो. ग. रांगणेकरांचे, अगदी घरगुती वातावरणातील हे नाटक, त्यातील चुरचुरीत आणि चटपटीत संवादामुळे, कथानकाच्या ओघातच आलेल्या गाण्यांमुळे आणि भावगीतांच्या अंगाने सजलेल्या स्वरसाजामुळे अत्यंत लोकप्रिय ठरले. तशी या नाटकात अवघी ६ गाणीच आहेत. पण कथानक आणि नाटकातील प्रसंग यामध्ये समन्वय साधणारी आहेत. मा.कृष्णानी दिलेल्या सुमधुर चालींचा त्या गाण्यांच्या लोकप्रियतेत जेवढा वाटा आहे तेवढाच ज्योत्स्ना भोळे आणि अविनाश यांच्या सहजसुंदर गायनाचा आहे. “मनरमणा मधुसूदना" "मुखी राहो" किंवा "अमृत बोला” ही भैरवी ( ज्योत्स्नाबाईंच्या तोंडची ) जेवढी गाजली तेवढेच अविनाशांच्या तोंडचे, पहिल्याच अंकातील "किती तरी आतुर प्रेम आपुले” हे वातावरण भारून टाकणारे गीत गाजले आणि त्याहून अतिहास निर्माण केला तो अविनाश-ज्योत्स्ना भोळे यांच्या तोंडी असलेल्या द्वंद्वगीताने. वास्तविक मूळ नाटकात हे द्वंद्वगीत नव्हते पण अविनाशना सारखे असे वाटे की नाटकात नायक-नायिकेचा (देवदत्त आणि भानुमती) जो संघर्ष आहे, त्याला अशा द्वंद्वगीताने रंगत येईल. मात्र मो. ग. रांगणेकराना तसं वाटत नव्हतं. “तुम्ही म्हणता तशा पदासाठी नाटकात जागाच नाही. मग कसं टाकणार पद?” असे ते म्हणत. पण अविनाश अस्वस्थ होते. त्यानी नाटकाच्या संहितेचे पुनः पुन्हा मनन केले आणि पहिल्या अंकात 'योग्य' जागा त्याना सापडली. मग रांगणेकरानी एक पद लिहिले. इतके होईपर्यंत नाटकाच्या प्रयोगाची तारीख जवळ येऊन ठेपली. दुसरे दिवशी प्रयोग सकाळी ८ ॥ वाजताच होता. मा. कृष्णानी आदले दिवशी रात्री नऊपर्यंत पदाला चाल लावली. अविनाशनी आणि ज्योत्स्नाबाईंनी, नोटेशन पध्दतीने ते पद पाठ केले. आणि दुसऱ्याच दिवशी दोघानी, ते द्वंद्वगीत विलक्षण सुंदर रंगवले. त्याची सुरुवात अशी होती:


सांगली आणि सांगलीकर................................................................. . १६१