पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्याच सुमारास आचार्य अत्रे यानी आपल्या 'अत्रे पिक्चर्स'साठी, गणपतरावांबरोबर दहा पिक्चर्सचा 'तोंडी' करार केला. त्यानी गणपतरावांची नाट्य-अभिनय-संगीत क्षेत्रातील गुणवत्ता जाणली होती. त्यांचे ५-६ पिक्चर्स अयशस्वी झाले होते ते तर अनेक कारणांमुळे. सिनेमाच्या पडद्यावरसुद्धा गणपतराव किती मोहक आणि आकर्षक दिसतात याची गुणग्राही अत्र्यांना यथार्थ कल्पना होती. म्हणूनच त्यानी आपल्या चित्रपटांसाठी, ‘गणपतराव मोहिते' या लांबलचक नावाला सुट्टी देऊन 'मा. अविनाश' हे सुटसुटीत नांव दिले. अत्रे पिक्चर्सचा 'पायाची दासी' हा चित्रपट खूप गाजला. अविनाशबरोबर त्यावेळी नायिका होत्या वनमालाबाई. हाच चित्रपट 'चरनोंकी दासी' या नावाने हिंदीत पण निघाला. 'घरजावई' चित्रपटात 'अविनाश' बरोबर शोभना समर्थ होती. शिवाय वनमालाबाई होत्याच.
 अविनाशांची वाढती लोकप्रियता पाहून 'प्रकाश' पिक्चर्सच्या विजय भट्ट या नामवंत निर्माता-दिग्दर्शकाने त्या काळी भरघोस वाटणाऱ्या रु१४००/- पगारावर आपल्या 'भरतभेट' साठी अविनाशना पाचारण केले होते. पण अत्र्याना 'तोंडी का होईना पण 'शब्द' दिला असल्यामुळे मा. अविनाशना ती संधी नाकारावी लागली! अलट अकडे अत्र्यानी आपल्या 'वसंतसेना' या महत्वाकांक्षी चित्रपटात सपाटून मार खाल्ला. त्याना अनेक कर्जे झाली. त्यामुळे अविनाशांचा शोभना समर्थबरोबरचा 'राजा-रानी' हा चित्रपट अर्धवटच राहिला!
 अशा तऱ्हेने हा सिनेमा पर्वाचा दुसरा कालखंड अचानक संपुष्टात आला. अत्रे पिक्चर्सचे सर्व चित्रपट पूर्ण झाले असते तर सर्व हिंदुस्थानभर अविनाशांचे नाव झाले असते! अनेक सिनेमांची कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्या दारी आली असती. तथापि असे म्हणणे म्हणजे अविनाशांच्या अदात्त प्रतिमेला अणेपणा आणण्यासारखे आहे. कारण पैशाचा हव्यास त्यानी आयुष्यात कधीच धरला नव्हता. त्याना ओळखणाऱ्या सर्वानाच ही गोष्ट पुरतेपणी माहीत आहे.
 अत्रे पिक्चर्समुळे आणि विशेषत: खास गाजलेल्या 'पायाची दासी' या चित्रपटामुळे अविनाशना चांगलीच प्रतिष्ठा मिळाली.
 त्यामुळेच अविनाशना कामासाठी कधी कुणाच्या दाराशी जावे लागले नाही. अत्रे पिक्चर्समधून मोकळे होता होताच, त्याना प्रख्यात नाटककार, निर्माते-दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर यानी आपल्या 'नाट्यनिकेतन' संस्थेत 'कुलवधू' साठी आमंत्रण दिले.
 आता त्यांच्या आयुष्यातील तिसरे मोठे पर्व सुरू झाले.

 १९४२ ते १९७५ अशी तब्बल ३३ वर्षे त्यानी 'नाट्यनिकेतन' मध्ये घालवली.


सांगली आणि सांगलीकर.............................................................. .१६०