पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामुग्रीने सज्ज असे पस्तीस ते चाळीस विभाग या स्टुडिओत होते. कंपनीतर्फे पहिला चित्रपट तयार झाला तो 'कृष्णार्जुन युद्ध.' त्या चित्रपटात गणपतरावांची नारदाची मध्यवर्ती भूमिका होती. 'अयोध्येचा राजा' या पहिल्या चित्रपटानंतर मराठीत निर्माण झालेला हा पाचवा चित्रपट मात्र अपेक्षित यश मिळवू शकला नाही. त्यानंतर निर्माण झालेल्या ‘सत्याचे प्रयोग' या चित्रपटात गणपतरावानी नायकाचे ( मनोहर) काम केले. योगायोगाने नायिकेच्या भूमिकेत सांगलीच्याच बाळाबाई पोतदार होत्या. नंतरच्या 'भक्त पुंडलिक' मध्ये त्यानी पुंडलिकाची मुख्य भूमिका केली. त्यानंतर 'ठकीचे लग्न' 'अंधेरी दुनिया' (हिंदी), 'लक्ष्मीचे खेळ' असे चित्रपट बनवण्यात आले. पण तांत्रिक बाबतीतील अनुभव, एकूण सिने-धंद्याविषयीचे अज्ञान, यामुळे हा चित्रपट अद्योग चांगलाच महागात पडला. शेवटच्या अपुऱ्या राहिलेल्या 'कंगाल' चित्रपटाने तर कंपनीला पुरे कंगाल बनवून टाकले आणि कंपनी शेवटच्या घटका मोजू लागली.
 या सर्व चित्रपटांतून गणपतरावानी कामे तर केलीच पण कौतुकाची गोष्ट म्हणजे या ६-७ चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यानी स्वतःच केले होते. चित्रपट अयशस्वी झाल्यामुळे त्यांच्या या वेगळ्या पैलूचे, व्हावे तसे कौतुक झाले नाही. एरवी त्यांच्या चित्रपट कारकीर्दीतील हा खरोखरी मानाचा शिरपेच होता.

 एकंदरीत दीनानाथ आणि चिंतामणराव कोल्हटकर या 'बलवंत' च्या मालकाना चित्रपटाचा धंदा मानवला नाही. नाटकाचा धंदा यशस्वी करायचा म्हणून चित्रपट बनवले तो अलटे शूटींगला पैसे कमी पडले की नाटके लावायला लागायची! परिणामी, दोन्ही आघाड्यावर सपाटून मार बसला. वाईट वेळ आली की एकमेकांवर दोषारोप सुरू होतात. दीनानाथांचे, चिंतामणरावांचे लहान-सहान कारणांवरून बिनसू लागले. विश्राम बेडेकर आधीच शिष्यवृत्ती मिळाल्याने अिंग्लंडला निघून गेले होते. कंपनीची देणी वाढू लागली. दीनानाथांचे व्यसन वाढले. एक शेवटचा अपाय म्हणून बलवंत नाटक कंपनीचे चालकत्व गणपतरावांकडे देण्यात आले. वयाच्या सातव्या वर्षी ५ रु. पगारावर काम करणारा साधा मुलगा, कंपनीचा मालक बनला. ही घटना निश्चितच भूषणास्पद होती. पण हातात आलेले राज्य 'ओसाडवाडी' चे होते! नाटक आणि चित्रपटसंस्था मिळून दीड लाखाचा आर्थिक बोजा होता. गणपतरावानी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 'बलवंत' ला आणि दीनानाथांना सावरण्याची अहोरात्र धडपड केली. स्वत:साठी, बालगंधर्व आणि शांतारामबापू यासारखी अत्तुंग व्यक्तिमत्वे पुकारीत होती, तरी वैयक्तिक लाभाच्या संधी विनयपूर्वक नाकारल्या. पण त करुनहि गणपतराव आपल्या 'बलवंत' ला वाचवू शकले नाहीत. अखेरीस १९४१ च्या सुमारास सहा हजार रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन, गणपतरावानी 'बलवंत' संगीत मंडळींवर मोठ्या दुःखद अंतःकरणाने अखेरचा पडदा टाकला!


सांगली आणि सांगलीकर........................................................................... . १५९