पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तीच गोष्ट 'ब्रह्मकुमारी' नाटकाची. तपोधन गौतम, मा. दीनानाथ, तरतरीत लाडीक अहिल्या गणपतराव प्रेक्षकांचे डोळे, कान तृप्त करीत. गणपतराव अशाच ताकदीने दीनानाथांच्या अन्य स्त्री- भूमिका लतिका (भावबंधन) शिवांगी ( राजसंन्यास) करीत असत.
 पण बोलपटांचा जमाना सुरू झाला आणि रंगभूमीच्या वैभवाला दृष्ट लागली.
 अर्थात् जाणकारांच्या मते रंगभूमीचे वैभव लयाला जाण्यास तेवढे एकच कारण नव्हते. प्रेक्षकांची अभिरूची बदलत चालली होती. संगीताचा थोडासा अतिरेक झाला असावा. ऐतिहासिक पौराणिक नाटकांचा 'ओव्हरडोस' झाला असावा. बोलपटांचे नाविन्य वाटले असावे. परिणामी, अनेक नामवंत कंपन्या बुडत चालल्या. अनेक ज्येष्ठ रथी-महारथी रंगभूमीचे वैभव सावरता सावरता त्रस्त झाले होते. बलवंतची चालक मंडळी पण या धामधुमीत मेटाकुटीला आली होती.
 अखेरची धडपड म्हणून कंपनीने विश्राम बेडेकरांचे 'ब्रह्मकुमारी' नाटक रंगभूमीवर आणले.
 या नाटकाचा पहिला प्रयोग १९३१ साली, सांगलीतच झाला. सांगलीचे राजेसाहेब श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांच्या शुभहस्ते. या नाटकात. चिंतामणराव कोल्हटकर इंद्राची, दीनानाथ गौतमाची भूमिका करीत तर गणपतराव अहिल्येची. कृ.प्र. खाडिलकरांनंतर इतकं सुंदर पौराणिक नाटकं दुसरं नाही, यावर सर्वांचं एकमत होतं. साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरानी तर 'केसरी' त म्हटलं होतं की “हे नाटक बघताना तोंडात खडीसाखरेचा खडा घेऊन, गुलाबांच्या ताटव्यानी फुललेल्या अद्यानात फेरफटका केल्याचा आनंद प्रेक्षकाना मिळतो.” बेडेकरांच्या लेखणीचं सामर्थ्य आणि सर्वांचं अभिनय कौशल्य, यामुळे रंगभूमीच्या पडत्या काळातही या नाटकानं चांगलंच यश मिळवलं. “विलोपले मधु मीलनात या" हे गाणं तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
 पण दुर्दैवाने हे नाटकही बलवंत नाटक मंडळीला फार सावरूं शकलं नाही. प्रेक्षकांसाठी बदल म्हणून काही सामाजिक नाटकं कंपनीनं करुन बघितली. पण प्रतिसाद शून्य. कंपनीची अवस्था दिवसेंदिवस खालावू लागली.

 शेवटी विषानेच विष अतरवण्याचा प्रयत्न झाला! म्हणजे असं की बोलपटांचं नाटकांवर आक्रमण होतय तर मग बोलपटच का नाही काढायचा? पैसा मिळवायचा आणि तो नाटकासाठी खर्च करायचा, असा विचार पुढं आला. या विचारातूनच १९३३साली 'बलवंत' पिक्चर्स अभी राहिली. स्थापना मुंबईत झाली पण कंपनीचा अद्यावत स्टुडिओ सांगलीत अभा राहिला. गणपती मंदिराच्या पिछाडीस, अत्याधुनिक


सांगली आणि सांगलीकर.................................................................. १५८