नलिनीच्या भूमिकेत काम करणारे गणपतराव असे संवाद आणि हे गाणे अशा काही ताकदीने व त्वेषाने म्हणत की प्रेक्षक थरारून जात. 'स्वातंत्र्यासाठी संगर' या सावरकरांच्या तेजस्वी विचारधारेचा, प्रत्येकाच्या अंत:करणात संचार होत असे. त्यानंतर “शरण नाही, रण मारीत मारीत मरण" या घोषवाक्याच्या संदर्भातील, 'स्वकुलनाशा.... हे देसकार रागातील पद सुरू होई. गणपतराव, अर्थातच दीनानाथी तडफदारीने ते पद गात असत.
दोन्ही पदाना गणपतराव दोन दोनदा, तीन तीनदा टाळ्या घेत. विंगेत असलेले वझेबुवा कौतुकाने म्हणत "वा, तुझा देसकार छानच जमलाय." सर्वजण कौतुक करतच पण खुद्द सावरकरही नलिनीचे काम बघून स्तिमित झाले होते. वास्तविक 'नलिनी' ही नायिकेची - सुलोचनेची सखी. त्यामुळे तशी ती छोटीशी व्यक्तिरेखा. पण गणपतराव अशा काही विलक्षण अदाकारीने त्यात रंग भरत की ही 'नलिनी' प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राही. खुद्द सावरकर 'बलवंत' च्या बिऱ्हाडी, चालकमंडळीना पत्र लिहिताना ‘माझ्या नलिनीस आशीर्वाद' असा गणपतरावांचा अल्लेख करीत.
सावरकरांची पल्लेदार भाषा समर्थपणे पेलवायची आणि खुद्द त्यांचीच शाबासकी मिळवायची. गणपतरावांच्या अभिनयाला आणि गानकौशल्याला वेगळी पावती ती कोणती ?
मा. दीनानाथांचं स्त्री-भूमिका करण्याचं वय मागं पडत चाललं तेव्हा त्यांच्या सर्व स्त्री - भूमिका आपसूकच गणपतरावांकडे आल्या. दीनानाथांच्या प्रमुख भूमिका त्याना झेपतील का? प्रेक्षक स्वीकारतील का? असा प्रश्नच मुळी कुणाच्या मनात आला नाही. एवढी गुणवत्ता गणपतरावानी तोवर सिद्ध केली होती.
आणि मग दीनानाथ नायक आणि गणपतराव नायिका असा सुंदर योग रंगभूमीवर जुळून आला.
दीनानाथांचे पाणीदार डोळ्यांचे भव्य रसरशीत व्यक्तिमत्व आणि त्याची साथ करणारं, गणपतरावांचं कोरीव, सुहास्य रूप! आज ९२ व्या वर्षीसुद्धा त्यांचं वृद्धत्व अितकं 'देखणं' वाटतं तर ऐन तरुण वयात त्यांचं 'रुपडं' काय असेल याची रसिकाला सहज कल्पना करता येते आणि स्त्री - भूमिकेतील त्यांचे फोटो बघितल्यावर खात्रीच पटते. ‘बलवंत' चे 'मानापमान' रूढ प्रयोगांपेक्षा खूपच वेगळे होते. दीनानाथांच्या तडफदार गाण्याने, जोरकस अभिनयाने, त्यांचा धैर्यधर, खराखुरा क्षात्रतेजसंपन्न धैर्यधर वाटे. त्यांच्या चौफेर फिरणाऱ्या, भरदार आवाजाचे गाणे, सबंध नाटकभर छाप पाडून जायचे तर त्याच अंगाने फिरणारे, गणपतरावांचे गाणे, त्याच्याशी सुंदर संवाद साधायचे, भरभरून प्रतिसाद द्यायचे!
सांगली आणि सांगलीकर.............................................................. १५७