पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्री-पुरूष भूमिका केल्या. वर अल्लेखलेल्या ध्रुव, प्रल्हाद, शाकुंतलशिवाय, पुण्यप्रभाव, मूकनायक, चौदावे रत्न, अग्रमंडल, देशकंटक, भावबंधन, रामराज्यवियोग, वेड्यांचा बाजार, राजसंन्यास, मानापमान, 'संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी अशा अनेक नाटकांतून त्यानी वेगवेगळ्या भूमिका केल्या. यशस्वी केल्या. गाजविल्या.
 अथं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी. ती अशी की त्याकाळचा नटवर्ग हा काही फारसा सुशिक्षित नसे किंबहुना बरेचजण शिक्षण अर्धवट टाकून, घरातून पळून आलेले असत. तेव्हा श्री. कृ. कोल्हटकर, गडकरी, खाडिलकर, वीर वामनराव जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा एकाहून एक सरस अशा भाषाप्रभूंची भाषा ही मंडळी कशी पेलत असावीत, याचे कधी कधी आश्चर्य वाटते. पण वस्तुस्थिती अशी की ही मंडळी अशा दिग्गजांची भाषा नुसतीच पेलत नसत तर नाटककाराची शब्दकळां, प्रेक्षकांच्या अंतःकरणात समर्थपणे पोचवून, हलकल्लोळ माजवून देत असत. गणपतराव तर जेमतेम दुसरी-तिसरीतच शाळेला रामराम ठोकून नाटकात आलेले. अशा माणसाने राजसंन्यास, संन्यस्त खड्ग अशा नाटकांच्या भाषा समजून मुखोद्गत करणे हे म्हणून कौतुकास्पदच होते.
 स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'संन्यस्त खड्ग' हे एक विलक्षण नाटक आहे. हिंसा आणि अहिंसा यांची तात्त्विक चर्चा करणारे हे एक ओजस्वी नाटक. मार्मिक तर्कमीमांसा असली तरी नाटकाची भाषा पांडित्यपूर्ण आणि त्यामुळेच क्वचित् प्रसंगी बोजड आहे. एक प्रसंग असा आहे. आत्यंतिक अहिंसेच्या आहारी गेलेल्या शाक्य मंडळींवर, कौसल्येश्वर विद्युत्गर्भाने अचानक हल्ला केलेला आहे. रणधुमाळीत, शाक्यांचा शूर सेनापती वल्लभसिंह हा शत्रूच्या हाती सापडला आहे. त्याची पत्नी सुलोचना ( मा. दीनानाथ ) आपली सखी नलिनी (गणपतराव मोहिते) हिला म्हणते की अशा प्रसंगी कर्तव्य काय म्हणते ते सांग. तेव्हा नलिनी म्हणते.
 "सारी शाक्य जमात विद्युतगर्भाच्या तलवारीने भोसकली जात असता, आम्ही क्षत्रिय कन्यांनी, अंत:पुरात मुळुमुळु रडत न बसता, तू म्हणतेस तसे सैनिक वेष घेऊन, शत्रूचा सूड अगवीत, खड्गा खड्गीतून अठलेल्या ज्वालांवर चढून, प्रिय स्मृतींसह सती जावे. कारण,

“मृत काष्ट तृणातीत ना, सती
जातात वीरांगना ।
शस्त्र संघर्ष घे चेतना, तथा
रणानीत दारुणा,
सूडाच्या जातात वीरांगना ।".............


सांगली आणि सांगलीकर............................................. १५६