पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बाल कलाकार म्हणून गणपतरावांची कारकीर्द सुरू झाली तेव्हा दोन महान विभूतींचे त्याना आशीर्वाद मिळाले. त्यातील पहिले म्हणजे बॅ. मुकुंदराव जयकर. १९१८ च्या सुमारास, किर्लोस्कर मंडळीमधील फाटाफुटीनंतर, स्थापन झालेल्या बलवंत संगीत मंडळींच्या 'पहिल्या' नाटकाचा पडदा वर गेला तो बॅ. जयकरांच्या हस्ते. 'शाकुंतल' नाटकाचा प्रयोग लावलेला होता. त्या नाटकातील कण्वशिष्य ऋषिकुमाराचे काम गणपतरावाना होते. त्यावेळच्या लहान वयातील गोड आवाजात म्हटलेलं गाणं अितकं रंगलं की प्रयोग झाल्यावर छोट्या गणूला "तुझं साभिनय गाणं मोठं छान झालं हं” असे प्रशंसोद्गार काढत बॅ. जयकरानी आपल्या हातातील सोन्याचं घड्याळ त्याला बक्षीस दिलं. जयकर भारावून गेले, ते पद खरोखरच रंगत असे. तिसऱ्या अंकातील, पहिल्या प्रवेशातील त्या पदाला गणपतराव टाळी घेत. किती तरी दिवस ती 'बलवंतची पहिली टाळी' म्हणून ओळखली जाई !
 अर्थात् त्या वयात छोट्या गणूला जयकर कोण, त्यांची योग्यता काय याविषयी काहीच माहीत नव्हते.
 त्यानंतरची दुसरी महान व्यक्ति होती म्हणजे खुद्द लो. टिळक. ते मात्र छोट्या गणूला निदान ऐकून तरी नक्कीच माहीत होते!
 ‘बलवंत' ने एकदा होमरूल चळवळीच्या मदतीसाठी गडकऱ्यांचं 'पुण्यप्रभाव' नाटक लावलं होतं. त्यातील युवराजाची भूमिका व त्याच्या तोंडची गाणी गणपतरावानी एवढ्या समरसतेने म्हटली की प्रयोग पहावयास आलेले लोकमान्य टिळक प्रभावित झाले. गणपतरावाना बघून शाबासकी देत, ते अिकडे तिकडे बघू लागले. त्यांच्या मनात काहीतरी द्यायचे असावे. तेव्हा त्यांच्याजवळच्या एका माणसाने हातातील अंगठी पुढे केली. ती लोकमान्यानी गणपतरावांच्या बोटात घातली. तो प्रसंग आठवला की आज ८० वर्षानंतरसुध्दा त्यांच्या अंगावर रोमांच अभे राहतात. त्या थोर पुरुषाच्या सुवर्णमयी आशीर्वादामुळेच आपली नाट्यकारकीर्द सुवर्णमय झाली आणि म्हणूनच अनेक सुवर्णपदकांचा सन्मान प्राप्त झाला अशीच त्यांची श्रध्दा आहे.
 लोकमान्यांमुळेच त्याना मोठ्या समारंभात 'वंदे मातरम्' म्हणण्याची संधी मिळाली. होमरूल चळवळीच्या मार्गदर्शनासाठी, त्यावेळी पुण्यातील 'किर्लोस्कर' थिअटरमध्ये (नंतरचे वसंत टॉकीज) मोठी सभा भरली होती. खुद्द लोकमान्य, अॅनी बेझंट, बॅ. जीना, गांधी, दोन्ही शौकत अली, शि. म. परांजपे, न. चि. केळकर, खापर्डे, असे दिग्गज जमले होते. त्यांच्या अपस्थितीमध्ये 'वंदे मातरम्' चे संपूर्ण गीत गणपतरावानी असे काही भावपूर्ण स्वरात म्हटले की सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

 'बलवंत' मध्ये असताना कंपनीच्या बहुतेक सर्व नाटकांतून गणपतरावानी


सांगली आणि सांगलीकर................................................................... . १५५