पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गाण्याचे मोठे शौकीन. ते छोट्या गणूकडून रोज एक तरी गाणं म्हणवून घेत. "नापास झालास तर मी पास करेन पण गाणं सोडू नकोस" असा त्यांचा आग्रह असायचा. तसं गणपतरावांचं गंडाबद्ध असं संगीत-शिक्षण, कोणाकडं झालं नाही. मात्र गणपतीबुवा भिलवडीकर यांजकडे थोडं शिक्षण झालं. गळा आणि अभिनय अपजतच अंगी असावा.
 घरच्या परिस्थितीच्या रेट्यामुळे शाळा अर्धवटच सोडून थोरल्या बंधुंमुळे अवघ्या ७ व्या वर्षीच, गणपतराव 'बलवंत' चे पगारी नोकर बनले. त्यांचा पगार रु.५/- तर बंधुंचा पगार रु. २५/- दोघांचेहि पगार त्यांच्या हातात मिळत नसत. कंपनीच्या मुक्कामाहून ते पैसे सांगलीला परस्पर वडिलांकडे पाठवले जात. (मा. अविनाश आता गंमतीने सांगतात की स्वतःच्या हातात पैसा असा त्यानी वयाच्या तिशीनंतरच बघितला ! ) नाटक कंपनीत बालनटांना थोडे शिक्षण दिले जाई. ही ‘बलवंत' संगीत मंडळी, प्रख्यात 'किर्लोस्कर' नाटक मंडळी फुटल्यानंतर स्थापन झाली. बालगंधर्वानी 'गंधर्व' नाटक मंडळी काढली, तर मा. दीनानाथ, चिंतामणराव कोल्हटकर आदी मंडळीनी 'बलवंत संगीत मंडळी' स्थापन केली. नटश्रेष्ठ चिंतामणराव स्वत: छोट्या गणूचा चौथीचा अभ्यास घेत. खासगी रीत्या गणपतरावांचे एक दोन वर्षे शिक्षण झालं. थोडी झटापट इंग्रजी भाषेबरोबरही झाली. रंगभूमीवरचं शिक्षण मात्र जोरात सुरू झालं.

 सुरुवातीच्या काळात, गणपतरावाना त्यांच्या बालवयाला शोभतील अशाच भूमिका दिल्या जात. त्या बालवयातील या छोट्या गणूच्या अतिशय गाजलेल्या भूमिका म्हणजे ‘भक्त प्रल्हाद' नाटकातील प्रल्हादाची आणि 'भक्त ध्रुव' नाटकातील ध्रुवाची. गोड गळा आणि धिटाईनं केलेला अभिनय, यामुळे त्यांच्या दोन्ही भूमिका गाजल्या.अितक्या गाजल्या की जवळजवळ तीन वर्षे 'बलवंत' ही नाट्यसंस्था या 'बाल' कलाकाराच्या छोट्याशा खांद्यावर अभी होती! याची साक्ष खुद्द चिंतामणराव कोल्हटकर यांच्या 'बहुरुपी' या आत्मचरित्रात मिळते. त्यानी मुळी दोन्ही नाटकांच्या अत्पन्नाचा आलेखच काढून दाखवला आहे. भक्त प्रल्हाद हे नाटक, बिगर मराठी प्रेक्षकांसाठी, हिंदी भाषेत 'धरम का चाँद' या नावाने सादर केले जाई. या दोन्ही नाटकांमुळे गणपतरावाना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पैसा मिळायचा प्रश्नच नव्हता. कारण तो त्यांच्या हाती येतच नसे! कंपनीचा मुक्काम ज्या गावी असे, त्या गावची भाविक मंडळी या ध्रुवाला, या प्रल्हादाला घरी घेऊन जात. त्याची पूजा करत. गोड-धोड खाऊ घालत. नवे नवे कपडे देत आणि घोड्याच्या गाडीतून (त्या काळातील मोठी चैन!) कंपनीच्या बिन्हाडी आणून पोचवत. निरागस बाल्य, सहजसुंदर अभिनय आणि भावानुकूल गाणे यामुळे या छोट्या गणूला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.


सांगली आणि सांगलीकर..................................................................... .१५४