पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संगीताच्या अंगाने जाणाऱ्या, नव्या संगीत नाटकांतून सारख्याच ताकदीने गाणारे एकमेव हयात नटश्रेष्ठ आहेत. या दोन्ही नाट्यपरंपरेत पारंगत असणे हे सकृतदर्शनी दिसतं तेवढं सोपं नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी करणाऱ्या तंत्रशुद्ध कसोटी फलंदाजाला, एकदम आडवे तिडवे फटके मारण्याची गरज असणाऱ्या अक दिवसीय क्रिकेट सामन्यात खेळवण्यासारखे आहे.
 पण मा. अविनाशानी दोन्ही प्रकारांमध्ये सुयश मिळवले हे महत्त्वाचे. दोन्ही प्रकारच्या संगीत परंपरांचे यशस्वी प्रतिनिधित्व करणारे, मा. अविनाश म्हणजे गेल्या ८०-९० वर्षाचा, नाट्यकलेचा चालता-बोलता अितिहासच आहे.
 अशा या अविनाशांचा, गणपतराव मोहिते, यांचा जन्म १ जानेवारी १९०९चा. त्यांचं बालपण सांगली-मिरजेत गेलं. खरं म्हणजे बालवयातच, म्हणजे अगदी वयाच्या ६ व्या- ७ व्या वर्षापासूनच, त्यांची रंगभूमी - कारकीर्द सुरू झाली. घरातच गाण्याचं बाळकडू मिळालं. त्यांचे वडील लक्ष्मणराव मोहिते हे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर या प्रख्यात संगीतशार्दुलाचे शिष्य. त्यामुळे घरातल्या घरातच, येता- जाता गाणं कानांवर पडायचं. वडिलांमुळेच अविनाशना, विष्णु दिगंबर पलुस्कर, चाफेकरबुवा, नीलकंठबुवा जंगम यांचं गायन ऐकायला मिळालं. गाण्याची ओळख वडिलांमुळे, तर अभिनयाची ओळख बंधु शंकरराव मोहिते यांच्यामुळे झाली. घरची थोडीशी शेती होती. गणपतरावांसह घरात आठ भावंडं. चुलत भावंडांसह मोठा बारदाना. नुसत्या शेतीवर कुटुंबाची गुजराण होणे कठीण. त्यामुळे गणपतरावांचे थोरले बंधू नाटक कंपनीत शिरले. 'स्वदेशी हितचिंतक,' 'नाट्यविनोद' अशा नाटकमंडळीत ते काम करत. ते काही काळ 'ललितकले' मध्ये होते. नंतर ते 'बलवंत संगीत' मंडळीत स्थिरावले. गणपतरावाना पण नाट्यव्यवसायाची थोडीशी ओळख व्हावी म्हणून ललितकलेत काही काळ ठेवण्यात आलं होतं. तेथे संगीतसूर्य केशवराव भोसले याना जवळून पहायला मिळालं. अितकंच काय, पण छोट्या गणूचा गोड गळा ऐकून केशवरावानी 'शापसंभ्रम' नाटकात त्याला छोटीशी भूमिकाही दिली. त्या भूमिकेतील एका गाण्याच्या दोन-दोन ओळी, मा. अविनाशना आज ९२ व्या वर्षीसुध्दा आठवतात. “द्राक्ष, जांब, डाळिंब फळे मी खायाला जाते...... कादंबरीची कुसुम कंचुकी गुंफाया जाते.”
 ज्या रंगभूमीवर आयुष्याची ६०-७० वर्षे, मा. अविनाश घालवणार होते, त्याचे पदार्पण असे केशवरावांच्या आशीर्वादाने झाले ही मोठी भाग्याचीच गोष्ट. थोरल्या बंधूंमुळे अभिनयाची जाण त्याना खूप लहान वयातच आली.

 अिकडे सांगलीच्या दोन नंबर शाळेत शिक्षण चालू होते. वर्गशिक्षक पटवर्धन


सांगली आणि सांगलीकर................................................................... . १५३