पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मामांना कधी मिळाल्या नाहीत. तशी देखणी शरीरयष्टी नव्हती म्हणून असेल किंवा जिभेचा फटकळपणा नडला असेल. पण सुदैवाने आयुष्याच्या अत्तरार्धात त्यांच्या अभिनय-गुणांचं बरंच चीज झालं. आयुष्यात त्याना सन्मानही बरेच लाभले. १९६५ मध्ये त्याना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे, कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींच्या नावे दिले जाणारे सुवर्णपदक मिळाले. १९६६ मध्ये तर त्यांच्या माहेरीच, म्हणजे सांगलीत, त्यांचा मोठा सत्कार झाला. विष्णुदास भावे सुवर्णपदक त्याना देण्यात आलं. त्यावेळी, ज्या गावात आपण गवंडीकामं केली, पडदे रंगवले, वर्तमानपत्रं टाकली, त्याच गावातील भव्य सत्कार पाहून मामा भारावून गेले. १९८१ च्या रंगभूमी दिनी (५ नोव्हेंबर) मुख्यमंत्री अंतुले याजकडून महाराष्ट्र सरकारतर्फे रु.२५।- हजाराची थैली त्याना देण्यात आली तसेच १९८२मध्ये दिल्लीच्या संगीत नाटक अॅकेडमीकडून त्यांचा पाच हजार रुपये आणि ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला. ७५ व्या वर्षी मामांचा श्री. पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी सत्कार मोठ्या थाटामाटात करण्यात आला. मिळालेल्या सत्कारनिधीमधून मामानी आपल्याला गुरुस्थानी असणाऱ्या केशवराव दाते यांच्या नावे पारितोषिक ठेवावे असे सांगून ५५ हजाराचा निधी नाट्य परिषदेकडे सुपूर्द केला.
 ८५ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलेल्या मामानी “केशराचं शेत" या नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. अशी ही सांगलीकर मामा पेंडशांची नाट्यकारकीर्द.

●●●

सांगली आणि सांगलीकर...................................................................

. १५१