पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिनेमात काम केले. पण रंगभूमीसारखे त्यांचे मन चित्रपटात रमले नाही. आजारपणाच्या काळात नाटकं चालूच होती. १९४६ च्या नाट्य महोत्सवात 'सवाई माधवरावाचा मृत्यु' हे नाटक झाले. मामाना 'माधवराव' करुन पहायचा होता. पण 'नाना फडणीसा' च्या भूमिकेसाठी, त्यांच्याखेरीज दुसऱ्या कुणाचा विचारच होऊ शकत नव्हता! नंतर १९५२ मध्ये त्यानी नाट्य-निकेतनच्या 'रंभा', 'कुलवधू,' 'एक होता म्हातारा,' अशा बऱ्याच नाटकांतून भूमिका केल्या. दिल्ली, नागपूर, खामगाव, अकोला, जळगाव, नाशिक असा मोठा दौरा त्यानी कंपनीबरोबर केला.
 सांगलीकरांना आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 'नाट्य-निकेतन' मध्ये, त्यावेळी एक सोडून दोन सांगलीकर, एकाच वेळेस काम करत होते. एक मामा पेंडसे आणि दुसरे मा. अविनाश !
 १९५७ मध्ये मामांच्या नाट्य- कारकिर्दीमधील अत्यंत यशस्वी गाजलेली भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं. ते म्हणजे 'दुरितांचे तिमिर जावो.' त्या नाटकातील खलनायकाची - पंतांची भूमिका, मामा अितकी कावेबाजपणे करत की त्या पात्राचा नायकाला (दिगू) छळण्याचा दुष्टपणा बघून एक प्रेक्षक, पायातली चप्पल घेऊन मामांना मारायला स्टेजवर धावला होता! अितका मामांचा खलनायकी अभिनय प्रेक्षकांच्या मनात चीड अत्पन्न करणारा असे. ललित कलादर्शचे भालचंद्र पेंढारकर, हे नाटक चांगले अत्पन्न देत नाही म्हणून बंद करायला निघाले होते! पण मामानी थांबवले. या नाटकाच्या यशस्वितेचा मामांचा होरा पुढे खरा ठरला. मामांचे असेच त्यावेळी दुसरे नाटक पण गाजले. ते म्हणजे ललित कलादर्शचेच 'पंडितराज जगन्नार्थं.' त्यात ते शहाजहानची भूमिका करत. पुढे पुढे भालचंद्र पेंढारकरांबरोबर मतभेद वाढत चालले तेव्हा मामानी १९६९ च्या अखेरीस 'ललितकलादर्श' बरोबरचा संबंध संपवला !
 यानंतर वृद्धापकाळामुळे मामा दिग्दर्शनाकडे जास्ती वळले. 'रंगायन' च्या 'यशोदा,' 'महापूर' अशा नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. १९८१ मध्ये मामांच्या ७५ व्या वाढदिवशी, मुंबईमध्ये सर्व नाट्यसंस्थांच्या वतीने त्यांच्या नाट्यसेवेचा गौरव म्हणून त्यांचा थाटाचा सत्कार करण्यात आला. पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते त्याना थैली देण्यात आली. मामानी त्यातून आपल्याला गुरुस्थानी असणाऱ्या कै. केशवराव दाते यांच्या नावे पारितोषिक ठेवले. त्यानंतर मामानी रंगभूमीचा निरोप घेतला.
 १२ जानेवारी १९९१ मध्ये मामांचे ठाणे येथे निधन झाले.

 अंगात गुणवत्ता असूनही, त्याचवेळेचे त्यांचे समकालीन नट श्री. गणपतराव मोहिते ( मा. अविनाश) याना जशा नायकाच्या भूमिका मिळाल्या तशा भूमिका


सांगली आणि सांगलीकर............................................................. १५०