पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भूमिका बघून पाठ थोपटली.
 दुर्दैवाने या नाटकातील हिंदू-मुसलमान जातीसंबंधातील काही संवादांमुळे आणि झेबुन्निसा छोट्या संभाजीचा मुका घेते, या दृष्यामुळे काही धर्मांध मुसलमानांनी हे नाटक बंद पाडले. पुढे केशवराव दाते कंपनी सोडून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत नाटके रंगेनात. अशा अनेक कारणानी 'समर्थ' नाटक मंडळी बंद पडली.
 आणि पुन्हा मामा बेकार अवस्थेत सांगलीला घरी परतले!
 काही काळ ‘रमेश नाटक' मंडळीमधून मामानी कामे केली. वास्तविक त्यावेळी सांगलीत आलेल्या 'बलवंत संगीत मंडळी' मध्ये त्यांचे सोने झाले असते. पण मामाना त्यांचा जन्मजात फटकळपणा नडला. खुद्द चिंतामणराव कोल्हटकर या दिग्गजाबरोबर भूमिकेच्या सादरीकरणावरुन मामानी वाद घातला. मालक दीनानाथ आजारी पडले तर त्यांच्याशिवाय कंपनी चालवू या, असा विचित्र आग्रह मामानी धरला! त्यामुळे 'बलवंत' मध्येपण त्यांचं जमलं नाही.
 आता नाटकं-बिटकं बंद करुन पोटापाण्यासाठी काही तरी अद्योग सुरु करावा असा कुटुंबियांचा आग्रह सुरू झाला. आता मामाना नाही पण म्हणता येईना. कोणत्या तोंडाने नाही म्हणणार? काही काळ त्यानी, मामा भटांच्या पुण्याच्या दुकानात अत्तरे, गुलकंद, केशवर्धक तेले, अदबत्त्या इत्यादी वस्तूंची विक्री केली. पण वस्तुंमधील भेसळीवरुन त्यानी खुद्द मालकांशी म्हणजे मामा भटांशीच भांडण काढले! शेवटी बायकोच्या पाटल्या वगैरे विकून मामानी लोण्याचा धंदा सुरू केला. सांगलीजवळच्या अंकली, इंगळी, म्हैसाळ अशा गावांतून एजंटामार्फत लोणी गोळा करायचे आणि ते मुंबईला व्यायाम - शिक्षक असलेल्या भावामार्फत विकायचे. त्याबरोबरीने सांगलीकडची मिरची पूड पण विकायला त्यानी सुरुवात केली. मुंबईत राहिल्याशिवाय पैशाची वसुली नीट होणार नाही असं भावानं कळवल्यावर मामांनी सांगली सोडून मुंबईत बिऱ्हाड थाटलं. कधी गिरगाव, कधी गोरेगाव तर कधी कुर्ल्याला अशी अनेक ठिकाणी त्यांची बिऱ्हाडे झाली. रात्री गोरेगावला जाऊन दूध आणायचं आणि सकाळी गिरगावात विकायचं. पायात चपला नाहीत आणि डोक्यावर दुधाचा हंडा, अशी मामांची भटकंती सुरु झाली. चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते, वामनराव सडोलीकर अशा मंडळींकडे त्यांचा दूधाचा रतीब होता.
 एका अर्थाने रंगभूमीचीच ही देणगी !

 काही असो. मामांच्या गाठी चार पैसे नियमितपणानं साठू लागले हे खरे ! त्यांच्या अमृतमहोत्सवप्रसंगी मामांच्या या दूध व्यवसायाचा अल्लेख करुन पु. ल. देशपांडे म्हणाले “मामा दुधाचा हंडा अशा थाटात नेत असत की वाटे, हा हंडा नव्हे


सांगली आणि सांगलीकर.................................................... . १४७