पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या 'समर्थ' मध्ये मामा पूर्ण पाच वर्षे होते. 'करीन ती पूर्व' 'रक्तरंगण,' ‘मराठ्यांचे सिंहासन,’ अशा काही नाटकांतून त्यानी भूमिका केल्या. पण या कंपनीत आल्याचा सर्वात मोठा फायदा मामाना कोणता झाला असेल तर तो म्हणजे नाट्यक्षेत्रातील गुरु लाभण्याचा. हा 'गुरु प्रसाद' त्याना केशवराव दाते यांच्या रुपाने लाभला. कंपनीत आल्यावर मामांची काही कामे त्यानी बघितली. मामा काही बाबतीत नानासाहेब फाटकांचं अनुकरण करत; तेव्हा केशवरावानी, स्वतःच्या अभिनयाचा, आवाजाचा आवाका ओळखून, त्यानुसार स्वतःला शोभेल अशा पध्दतीने, कुणाचेहि अनुकरण न करता, स्वतंत्र बुद्धीने आपली भूमिका कशी करावी, त्या भूमिकेवर विचार कसा करावा, स्वत:च्या देहयष्टीला अनुसरुन हातवारे कसे करावेत, मुद्राभिनय किती महत्त्वाचा आहे अशा अनेक गोष्टी मामाना शिकवल्या. मामा त्यावेळी 'रक्तरंगण' मध्ये अनाजी दत्तोची भूमिका करीत. खलनायकी स्वरूपाची ही भूमिका होती. मामा मात्र अगाचच ती भूमिका विनोदी वळणानं करत. राजाराम आणि संभाजी ही दोन पात्रे जेव्हा जेव्हा या अनाजीला रागाने बोलत, तेव्हा हा अनाजी (म्हणजे मामा ) प्रतिक्रिया म्हणून डोळे मोठे करुन प्रेक्षकांकडे बघत असे. त्यामुळे हशा पिकायचा. पण त्याचा दुष्परिणाम असा व्हायचा की संभाजी या गंभीर पात्रावरील लक्ष अडून, सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष निष्कारण अनाजीकडे जात असे. नाट्यशास्त्राच्या दृष्टीने ही गोष्ट विपरीत आहे हे प्रथम केशवरावानी मामांच्या ध्यानात आणून दिलं. "नाटक ही एक सांघिक कला आहे. घडत असणारा प्रसंग, रंगभूमीवरील सर्व पात्रांनी मिळून साकार करायचा असतो. त्यात विक्षेप येईल असं कुणी वागला तर नाट्यरंगतीची हानी होते” असे त्यानी मामांच्या मनावर कायमचे कोरून ठेवले. मामानी केशवरावांच्या तालमीचा आयुष्यात कधीच विसर पडू दिला नाही. नट म्हणून तसेच दिग्दर्शक म्हणून.

 नंतर याच 'समर्थ' ने खुद्द औंधकरानी लिहिलेले 'आग्याहून सुटका' हे नवे नाटक रंगभूमीवर आणले. या नाटकातील औरंगजेबाची भूमिका मामाना द्यावी असं केशवराव दातेनी औंधकराना सुचविले. त्या भूमिकेसाठी योग्य अंची, कृश शरीरयष्टी, पाणीदार डोळे, अभट चेहरा अशा जमेच्या बाजू असल्याने मामा पेंडसे, त्या भूमिकेला अधिक न्याय देऊ शकतील असं दाते म्हणाले. पण पेंडसे रंगभूमीला तसे नवखे असल्याने, ती भूमिका केशवरावानी करावी असा औंधकरांनी हट्टच धरल्याने त्यांचा नाईलाज झाला आणि मामांच्या हातातून एक चांगली संधी निसटली. तरीपण संपूर्ण नाटकभर वावरणारी अमरखानाची भूमिका मामाना मिळाली. ती भूमिका त्यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली, अितकी छाप त्या भूमिकेत मामानी प्रेक्षकांवर पाडली. अकोल्याच्या प्रयोगाच्या वेळी गणपतराव बोडस यानी मामांची ही


सांगली आणि सांगलीकर.................................................................... .१४६