पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जबरदस्त रंगू लागले. प्रेक्षकांच्या टाळ्या घेण्यासाठी अस्फुर्त दाद मिळवण्यासाठी दोघानांहि स्फुरण चढले. आणि त्या आनंदात दत्तोपंत भोसल्यानी खूश होऊन मामांना खांद्यावर अचलून घेतले आणि ते चाफेकराना म्हणाले “अरे, याला गड्याची कसली कामे देता? याला नाटकांत घ्या. "
 तेव्हापासून मामांचा खऱ्या अर्थाने नाट्यप्रवास सुरु झाला. त्याना नियमितपणे कामे दिली जाऊ लागली. शारदेत 'श्रीमंत' पुण्यप्रभावामध्ये 'कंकण,' शहा - शिवाजी नाटकात 'रणदुल्लाखान,' चंद्रग्रहणमध्ये 'जगदेवराव' अशा त्यांच्या भूमिका गाजू लागल्या.
 पण दुर्दैवाने कंपनी आर्थिक दृष्ट्या फारशी तग धरू शकत नव्हती. कोर्टाच्या परवानगीने (तात्पुरत्या ) चाफेकर किर्लोस्कर कंपनी चालवत होते. त्या केसचा अंतिम निकाल त्यांच्याविरूध्द लागला. मग देणेकऱ्यानीही दावे लावले. जप्तीचे वॉरंट निघाले. १९२९ मध्ये अखेर कंपनीला टाळे लागले.
 आणि मामा सांगलीला परत आले.
 पुन्हा अन्नासाठी दाही दिशा सुरु झाल्या. वर्तमानपत्रं टाकण्यापासून जमेल ती कामं मामा करायचे. आईच्या कडवट बोलण्यानं अर्धी-मुर्धी मिळणारी भाकरीसुद्धा गोड लागेना.

 त्यातून नियतीनं तर त्याना रंगभूमीवरचा नट बनवण्याचाच चंग बांधला असावा. कारण तीन तीन नाटक - कंपन्यातून कामे मिळण्याचा अचानक योग आला होता. महाराष्ट्र नाटक मंडळीतील गाजलेले नट, मामा भट सांगलीचे. मामा पेंडशांच्या काही चांगल्या भूमिका त्याना आवडल्या होत्या. 'बेबंदशाही' वाले विष्णुपंत औधकरांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या 'श्री' समर्थ नाटक मंडळीनी मामा पेंडसेना कंपनीत घ्यावे म्हणून त्यानी औंधकरांना पत्र लिहिले. पण मामा पेंडशांच्या कुंडलीतील ग्रह असे विचित्र, की त्याच सुमारास हिराबाई बडोदेकर यानी सुरु केलेल्या, नव्या नाटक कंपनीत काम करण्याविषयी मामांकडे विचारणा झाली. हे कमी पडलं की काय, म्हणून- त्याना त्याचवेळेस मिरजेत आलेल्या मा. दीनानाथांच्या 'बलवंत संगीत मंडळी' मध्येहि काम मिळेल असे दिसू लागले. या 'तिहेरी' योगामुळे मामा मनोमन हरकून गेले आणि त्याचवेळी नाटक कंपन्यांमधून असणाऱ्या अनिश्चिततेचा त्याना कटू अनुभव आला. महिनोंमहिने दोन्ही कंपन्यांची बोलावणी, अनिश्चिततेच्या फेऱ्यांमध्ये गटंगळ्या खाऊ लागली तेव्हा मामा मुकाट्याने श्रीसमर्थ मंडळीत जाऊन दाखल झाले. ३०रु पगारावर. त्याच पगारावर काम करायचं म्हणून मामा तिथे जायला मनापासून राजी नव्हते, पण नाईलाज होता.


सांगली आणि सांगलीकर..................................................................... . १४५