पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकाशकांचे मनोगत

 'सांगली आणि सांगलीकर' हा श्री. अविनाश टिळक यांनी लिहिलेला मौलिक ग्रंथ, वाचकांच्या हाती सोपविताना आम्हाला अनेक कारणांनी विशेष आनंद होत आहे.

 सांगली (जिल्हा) नगरवाचनालय ही संस्था एक प्रकारे भूतपूर्व सांगली संस्थानचे अपत्य आहे. सांगली नगरीच्या स्थापनेला या वर्षी म्हणजेच २००१ सालात दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने श्री. टिळक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात औचित्य तर आहेच पण त्याशिवाय भूतपूर्व संस्थानच्या ऋणातून अंशतः अतराई होण्याची संधी या पुस्तकामुळे संस्थेला मिळाली आहे.

 या पुस्तकात सांगलीच्या गेल्या दोनशे वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेण्यात आला असून सांगलीसंबंधीची मौलिक माहिती एकत्र करण्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्रात स्पृहणिय कामगिरी बजावून सांगलीचे नांव उज्वल केलेल्या बावीस सांगलीकरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा सुयोग्य परिचय श्री. अविनाश टिळक यानी करुन दिला आहे. त्यामधून सांगलीच्या इतिहासाचे मनोज्ञ दर्शन घडते. सर्वांनीच आणि विशेषतः सांगलीकर जनतेने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. “जनतेत चांगल्या ग्रंथाची वाचन अभिरुची उत्पन्न करुन तिच्यामध्ये बौद्धिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे" या वाचनालयाच्या ध्येयधोरणाला पूरक होणारे कार्य अशा द्दष्टिकोनातून सदर पुस्तकाचे प्रकाशन संस्था करत आहे.

 या पुस्तकाचे लेखक श्री. अविनाश टिळक हे आमच्या कार्यकारिणीचे गेली दोन वर्षे तज्ञ सभासद आहेत. त्यानी अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिलेले पुस्तक सर्वार्थाने परिपूर्ण आहे असा संस्थेचा दावा नाही; किंवा लेखकाचीही तशी धारणा नाही. तथापि स्थानिक इतिहास लेखनाला आधारभूत ठरेल असेच हे पुस्तक आहे हे निश्चित. विस्मृतीत जात असलेल्या सांगलीकर व्यक्तींचे कर्तृत्व भावी पिढ्यांना स्फूर्तिदायक ठरेल आणि त्यांच्या कार्यापासून अनेक सांगलीकर युवक प्रेरणा घेतील अशी आशा आहे.

 एकशे बत्तीस वर्षे पूर्ण करीत असलेले सांगली (जिल्हा) नगरवाचनालय ही आज एक सुप्रतिष्ठित संस्था आहे. सांगलीच्या सांस्कृतिक जीवनात या संस्थेला महत्वाचे स्थान आहे. नेहमीच्या पारंपारिक कार्यापासून एक वेगळा उपक्रम, संस्था या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या रुपाने हाती घेत आहे. या कल्पनेचे स्वागत झाल्यास अशाच तऱ्हेचे उपक्रम राबवण्यास संस्थेला हुरुप येईल.

 दोनशे वर्षे पूर्ण करुनही तरुण दिसणाऱ्या आणि सातत्याने नवे बदल स्वीकारीत शिक्षणाचे आणि संस्कृतीचे पश्चिम महाराष्ट्रातील केंद्र बनलेल्या सांगली नगरीस या ग्रंथाच्या प्रकाशनाद्वारे आम्ही मानाचा मुजरा करीत आहोत.

ॲड. भा. य. डोंगरे
श्री. ज. भा. लिमये
 
(कार्यवाह)
(अध्यक्ष)
 
सांगली (जिल्हा) नगरवाचनालय, सांगली.
तेरा