पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाधानकारक तोडगा सापडला नाही.

 मग मी माझ्यापुरता सुवर्णमध्य साधला. ज्या कोणा व्यक्तीमुळे सांगलीचे नाव अुज्ज्वल झाले तो 'सांगलीकर'.

 मी निवडलेले बावीस मानकरी या स्वनिर्मित व्याख्येत बसतात; निदान ‘सांगलीकर' म्हणून सर्वमान्य असावेत ही अपेक्षा !

 साहित्य, नाट्य, संगीत, अद्योग, वैद्यक, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश या पुस्तकात केला आहे. अजून अनेक मान्यवर सांगलीकर आहेत. पण आर्थिक मर्यादांचा विचार करता, मला या बावीस सांगलीकरांपर्यतच स्वतःला थांबवावं लागलं; अन्यथा अजून किती तरी वर्षे मला थांबायला लागले असते! पण या पुस्तकाचे चांगले स्वागत झाल्यास 'आणखी काही सांगलीकर' समाजासमोर आणायची मनात अिच्छा आहे.

 "सांगली बहु चांगली," तेव्हा सांगलीविषयी काहीतरी हवंच, खरं म्हणजे सांगली नगरीच्या अतीव प्रेमापोटी, माझ्या या पुस्तकात 'सांगली' एवढ्याच विषयाचा मजकूर निम्म्यापेक्षा अधिक पुस्तक व्यापू लागला, तेव्हा नाईलाजाने मला ‘सांगली - नियमन' करावं लागलं. धावता आढावा घेत घेत 'मोठी' सांगली 'छोटी' करावी लागली!

 अगदी मूळच्या सहा गल्लयांअितकी ती छोटी होणार नाही याची मात्र काळजी घेतली!

 आपल्या कर्तृत्वाचा ठसा विविध क्षेत्रांमध्ये अुमटवणाऱ्या पूर्वसूरींचे आणि विद्यमान व्यक्तिंचे ऋण फेडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. भावी पिढ्यांना तो स्फूर्तिदायक ठरेल, प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा आहे.

 अशी एकूण ही 'सांगली आणि सांगलीकर' या पुस्तकाची पूर्वपीठिका.

बारा