पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि छंद म्हणून ते पडदे रंगवत असताना सगळे संवाद बडबडत असतात हे चाफेकरानी अनेकदा बघितले होते. म्हणून चाफेकरानी 'सैय्यद अलीचं काम करशील का?” म्हटल्यावर मामानी ताबडतोब आनंदाने होकार दिला. मात्र नाटकाच्या प्रयोगाच्या सुरुवातीला, मामा पायापासून डोक्याच्या केसांपर्यंत घाबरून घामाने थबथबलेले होते. पण हळूहळू सावरले आणि त्यांच्या नाटकातल्या पर्दापणाचे कौतुक झाले.
 त्या दिवसापासून मामांची 'ट्रॅन्स्फर' नटखात्यात झाली. तरीपण बॅकस्टेजचे, मदतनिसाचे नेहमीचे काम चालूच होतं. फक्त मधून मधून बदली नटांच्या भूमिका मिळू लागल्या. पगार ३० रुपयांवर गेला. अर्थात पूर्ण पगार आणि वेळेवर, हे गणित नेहमीप्रमाणेच न जमणारं. तरीपण निदान १५-२० रूपये घरी पाठवता येऊ लागले. तसं कंपनीमधलं मामांचं स्थान 'आयत्या वेळी' अपयोगी पडणारा नट असंच होतं.
 पण मामांच्या सुदैवाने आणखी एक चांगला 'दिवस' अजाडला. कंपनीचा मुक्काम मडगावला होता. 'राक्षसी महत्वाकांक्षा' हे नाटक लावलेलं होतं. संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे थोरले बंधू दत्तोपंत भोसले याना, त्यांच्या त्या नाटकातील गाजलेल्या ‘विक्रांत' च्या भूमिकेबद्दल चाफेकरानी मुद्दाम बोलावून घेतलं होतं. त्यांच्यामुळे निश्चितच तडाखेबंद तिकीट विक्री होणार होती. चाफेकरानी त्या नाटकातील ‘कुंदन' ची भूमिका मामाना दिली होती. कसून मेहनत घेऊन त्यांच्याकडून बसवून घेतली होती. चांगली घोटून घेतली होती. मामांची ही 'प्रगती' कंपनीतील काही जणांना मानवत नव्हती. त्यांच्यापैकी काहीनी मत्सरापोटी, दत्तोबा भोसले यांचे कान फुंकायला सुरुवात केली....." बघा बुवा, तुम्ही एवढे गाजलेले नट आहात आणि तुमच्यासमोर हा पेंडसे म्हणजे अगदीच नवशिक्या आहे. नाटकाचा तोल त्यामुळे बिघडेल. तुमचा अपमान आहे..... वगैरे वगैरे." साहजिकच दत्तोपंतानी या 'प्रकारा' बद्दल चाफेकरांना जरा रागातच विचारलं. त्यानी त्यांची समजूत काढून मामांच्या अभिनयाची ग्वाही दिली. तरीपण रात्री मेक-अपच्या वेळी समोर मामाना बघून दत्तोपंतांनी जरा दरडावूनच विचारले “ तूच ना तो पेंडसे, आज माझ्यासमोर अभा राहणारा?” मामा मनातून घाबरून गेले. कंपनीतील यःकश्चित गडी माणूस आपल्यासमोर अभा राहणार याचं वैषम्य दत्तोपंताना वाटत होतं.

 प्रत्यक्ष नाटक सुरु झालं. चाफेकरानी धीर देऊन मामांचा आत्मविश्वास वाढविला. पहिले काही प्रवेश संपले. मामांचे काम रंगू लागले. प्रेक्षकांच्या टाळ्या मिळू लागल्या. मामांची भीती चेपली. मग दत्तोपंतांबरोबरचा प्रवेश सुरु झाला. मामांकडून चांगली साथ अगदी बरोबरीची जोड मिळाल्याने, दत्तोपंतांचेहि काम


सांगली आणि सांगलीकर............................................................................ . १४४