पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वगैरे काही प्रकार नव्हता. म्हणजे नाटक मंडळीत मामानी प्रवेश केला तो केवळ चरितार्थाचे एक साधन म्हणून.
 आणि मामांनीच सांगितलय की तोपर्यंतच्या गरीबीमधील ओढाताणीच्या आयुष्यात 'भरपेट जेवण ही काय चीज असते हे त्याना कंपनीत जेवल्यावर प्रथमच समजले! त्याचप्रमाणे जेवण जरी पोटभर असलं, तरी नाटक कंपन्यांतून पगार पूर्ण आणि वेळच्या वेळी कधीच मिळत नाही, हे कटू सत्य पण त्याना पचवून घ्यावं लागलं!
 प्रत्यक्ष नाटकात काम नसलं तरी नाटकाचे, बॅक स्टेज वर्कर म्हणून मामांचं काम चालत असल्याने मामाना जागरणाची आपोआप सवय लागली. सहजगत्या नाटकांतील भाषणे पाठ होऊ लागली! कुतूहल निर्माण झालं. अर्थातच् मामाना सांगलीकर असल्यामुळे नाटकाचं अपजत वेड होतंच. काही काळ सांगलीच्या सिटी हायस्कूलमध्ये असताना, शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाटकात काम करुन त्यानी वाहवा मिळविली होती. त्यावेळचे त्यांचे सहाध्यायी राम केशव रानडे हे होते. ते पुढे न्यायाधीश म्हणून गाजले तर मामा नट म्हणून !
 कंपनीच्या नोकरीतून मामाना अचानक ब्रेक मिळाला!
 एकदा आगाशे नावाच्या नटाबरोबर कशावरुन तरी बाचाबाची झाली. शब्दावरुन शब्द वाढता वाढता गुद्दागुद्दी झाली. किरकोळ यष्टीच्या मामांनी आगाशेला चितपट करण्याचा प्रयत्न केला. परिणामी मामांच्या अजव्या मांडीचे हाड मोडले. मामा कंपनीत नवखे असल्याने सर्वानी तेच दंगेखोर आहेत असं ठरविलं.
 आणि मामांची सांगलीला हकालपट्टी करण्यात आली. वडिलांच्या ओढाताणीच्या संसारात पुन्हा एकाची भर पडली! कुठं काही नोकरीचं जमत नव्हतं. त्या काळात संस्थानच्या लग्नकार्यात अब्दागिरीच्या दांड्या रंगवण्याचं काम पण मामाना करावं लागलं.
 सुदैवाने किर्लोस्कर कंपनीच गावोगावी नाटके करत, फिरत फिरत सांगलीत आली. शंकरराव गायकवाडांनी चाफेकरांकडे रदबदली करुन मामांना पुन्हा कंपनीत घेतले. मामा पडदे रंगवायला लागले. पण मामा जन्मभर काय पडदेच रंगवणार होते का? नाही.

 एक दिवस मामांचा 'दिवस' म्हणून अजाडला. १९२७ च्या सप्टेंबर महिन्यात कंपनीचा ‘राजरंजन' नाटकाचा प्रयोग लागला होता. त्या नाटकातील "सैय्यदअलीचं” काम करणारा नट अचानक आजारी पडला. मामांच्या सर्व नकला पाठ असतात


सांगली आणि सांगलीकर...................................................................

. १४३